<
जळगाव- लॉकडाऊनमुळे राज्यात उद्योग-व्यवसाय बंद असल्याने विजेची मागणी कमी आहे.तर दुसरीकडे शेतीला रात्री वीज मिळत असल्यामुळे बळीराजाला दिवसासह रात्रीही राबावे लागत आहे.सद्य:स्थितीत पुरेशी वीज उपलब्ध असल्याने कृषिपंपांसाठी ही वीज दिवसा सलग द्यावी,अशी मागणी तालुक्यातील नंदगाव येथील सामाजिक कार्यकर्ता तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जळगाव तालुकाध्यक्ष स्वप्निल शांताराम सोनवणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांना मेलद्वारे निवेदन दात केली आहे.
सध्या ग्रामीण भागातील शेती पंपांना आठवड्यातून चार दिवस तेही रात्रीच्या वेळेमध्ये वीज पुरवठा केला जातो. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी संतप्त झाला आहे. रात्रीच्या वेळी अंधारात पिकांना पाणी देताना जंगली श्वापदांचा धोका होण्याचा संभव आहे. त्यामुळे सरकारने याकडे लक्ष देऊन संपू्र्ण आठवडाभर दिवसा वीज पुरवठा करावा.दिवसा वीज पुरवठा व्हावा अशी मागणी वारंवार करुनही ती मान्य केली जात नाही. वीज मंडळाला दिवसा वीज पुरवठा करण्यात काही मर्यादा असतील पण लॉकडाऊनमुळे औद्योगिक वसाहत मधील कारखाने बंद होते व यामुळे विजेची बचत मोठ्या प्रमाणावर झालेली असून पुरेशी वीज उपलब्धी झालेली आहे.
यामुळे औद्योगिक वसाहतींमधील कारखाने, सरकारी कार्यालयांमधील वीज पुरवठ्याप्रमाणे शेतकऱ्यांनाही दिवसा सलग वीज पुरवठा करून बळीराजाचा सन्मान करावा. इतर अनेक राज्यात शेती व्यवसायाला महाराष्ट्राच्या तुलनेत अनेक सुविधा उपलब्ध आहेत. म्हणूनच किमान या पायाभूत सुविधेचा विचार करावा.यामुळे बळीराजाचे हालही कमी होतील व यंदाच्या उत्पन्नात वाढ होऊ शकेल.यामुळे राज्यात सर्वत्र कृषिपंपांना दिवसा सलग वीजपुरवठा सुरु करावा,अशी विनंती यावेळी स्वप्निल सोनवणे यांनी आपल्या निवेदनामार्फत केली आहे.