<
उस्मानाबाद(जिमाका):- पावसाळयामध्ये वादळ,गारपीट,पुरपरिस्थती व साथीचे रोग या सारखी आपत्ती मोठया प्रमाणात ओढाऊ शकते अशा प्रकारची आपत्तीजनक परिस्थीती उद्भवल्यास जिल्हयाच्या विविध ठिकाणाहून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे मदतीसाठी विचारणा केली जाते. जिल्हयाच्या ठिकाणावरून मदत पोहोचविण्यास कदाचित विलंब लागू शकतो. त्यामुळे तात्काळ मदत मिळण्यासाठी व आपत्तीचे धोके टाळण्यासाठी प्रत्येक तालुकास्तरावरच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभारून ती कार्यान्वित करावी असे निर्देश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी दिले.प्रशासकीय इमारतीच्या जिल्हा नियोजन सभागृहात मान्सून 2020 पूर्व तयारी आढावा बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली दि.13 मे 2020 रोजी करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे म्हणाल्या की,पावसाळयामध्ये एखादा तलाव पाण्याने भरल्यानंतर तो फुटू नये किंवा त्यातून पाण्याची गळती होवू नये यासाठी जिल्हयातील पाझर,लघु व मध्यम प्रकल्प आदी सर्व तलावाची 30 मे पर्यंत कोणत्याही परिस्थितीत दुरुस्ती करणे आवश्यक आहे.तसेच दुरूस्ती झाली आहे किंवा नाही ? याचे सर्वेक्षण करून समन्वय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी. दुरूस्ती केलेल्या तलावांची जबाबदारी एखाद्या अधिकाऱ्यावर निश्चित करून नोडल अधिकारी म्हणून त्यांची नेमणूक करावी असे आदेशही त्यानी दिले.
तसेच आपत्तीच्या अनुषंगाने दि.1 जून ते 31 ऑक्टोबर 2020 या कालावधीत नियंत्रण अधिकारी म्हणून कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी.तसेच जिल्हयातील सर्व नगर परिषदांनी पावसाचे पाणी शहरातून शहरा बाहेर व्यवस्थित निचरा करण्यासाठी सर्व गटारे,नाले तात्काळ दुरूस्त करून घ्यावेत तसेच ज्या गटारी किंवा नाल्यावर अतिक्रमण करण्यात आलेले आहे ते काढून टाकावेत असे निर्देश श्रीमती मुधोळ- मुंडे यांनी दिलेत. जिल्हयातील जे नादुरूस्त पुल आहेत त्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याबरोबरच जिल्हयातील ज्या रस्त्यांची दुरूस्तीची कामे करण्याची गरज आहे.त्याचे देखील सर्वेक्षण करून ऑडीट करण्याचे संबंधित विभागाच्या अभियंत्यांना त्यांनी सूचित केले.
यावेळी जिल्हयातील पाझर तलावाची दुरूस्ती व देखभाल व्यवस्थित व्हावी यासाठी 250 पाझर तलावांचे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडे हस्तांतर करण्याच्या सूचना करून त्यापैकी 20 पाझर तलावांची सर्व कागदपत्रांची पूर्तता करून जि.प. कडे हस्तांतरीत करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. तसेच विद्यूत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हयात लोंबकळणाऱ्या तारा किती ठिकाणे आहेत ? याचे सर्व्हे करण्याचे त्यांनी सूचित केले.त्याबरोबरच ग्रामीण भागातील जे नाले अरूंद आहेत त्यातून पाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. त्यामध्ये झाडे झुडपे उगवलेली आहेत, ती तोडण्यासह सर्व प्रकारचे नियोजन ग्रामस्तरीय यंत्रणांनी करावे.
तसेच प्रमाणित कृती आराखडा याबाबत प्रत्येक पोलीस ठाणे,तहसिल कार्यालय या ठिकाणी आपत्ती बाबतचे सर्व साहित्य दिले असून त्याची अद्यावत माहिती संबंधित तज्ञ व्यक्तींचे नाव,संपर्क नंबर यांची माहिती उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वृषाली तेलोरे यांनी केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व विभाग प्रमुखांना सर्व माहिती अद्यावत ठेवण्याचे सांगितले.तर निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र खंदारे यांनी जिल्हयातील उघडे बोरचा सर्व्हे करून ते तात्काळ बंद करण्याची कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिली.जिल्हयातील अंगणवाडी,शाळा यांची दुरूस्ती करण्याबरोबरच समाज मंदीर,शाळा या ठिकाणी आपत्तीच्या काळात तात्पुरता निवारा उभारण्यासह गॅस्ट्रोचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी पाणी स्वच्छतेवर भर द्यावा असे आवाहन जि.प. मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.संजय कोलते यांनी केले.या बैठकीस जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.राज गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.हनमंत वडगावे,पोलीस उपअधीक्षक (गृह) अजुंम शेख, उपविभागीय पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड याच्यासह सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.