<
दिनांक: १४ मे २०२०, भोपाळ
मध्यप्रदेश येथील गुना लागत आज सकाळी ट्रक आणि बस यांच्यामधील भीषण अपघातात ८ प्रवासी मजुरांचा मृत्यू झाला आहे आणि ५४ लोक घायाळ झाले आहेत. अपघात झाल्यानंतर घटनास्थळी पोलीस प्रशासन पोचले आणि मदतकार्य सुरु केले आहे. घायाळ व्यक्तींना जवळील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार असे निदर्शनास आले आहे कि सदर घटनेतील मजूर हे उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील रहिवासी होते व महाराष्ट्रामध्ये मजुरी करण्यासाठी आले होते. लोकडाऊनमुळे काम बंद असल्याने उपासमारीची पाली त्यांच्यावर आली होती म्हणूनच ते पुनः स्वगृही परतत असताना वाटेतच अपघात झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात झाला तेव्हा ट्रक मध्ये जवळ जवळ ७० प्रवासी होते. आणि हा ट्रक महारष्ट्रामधून उत्तर प्रदेशच्या दिशेने चालला होता. हा अपघात रात्री ३ वाजता घडला. आणि बस गुना मधून अहमदाबाद जाणार होती. बस मध्ये फक्त चालक व क्लिनर होते.
कोरोना विषाणू प्रादुर्भावांच्या धर्तीवर संपूर्ण देशात लॉकडाऊन पुकारण्यात आला आहे. त्यामुळेच इतरत्र रोजगारासाठी गेलेलं मजूर हे त्या त्या राज्यात अडकून पडले आहेत. सरकार टप्प्याटप्प्याने स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करत आहे. पण कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये व त्यावर प्रतिबंध करता यावा यासाठी सोशल डिस्टंसिंग चे पालन करून मजुरांना स्वगृही पाठवण्यात व्यवस्था कमी पडत आहे. त्यामुळे अनेक मजूर हे स्वतःच ट्रक व बस ची व्यवस्था करून आपल्या गावाकडे निघालेआहेत.