<
कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर भांडुप पश्चिम भागात जनता दलाने सुरू केलेला मदतीचा ओघ सुरूच असून काल बुधवारी भांडुप पश्चिम,गावदेवी रोड येथील साधारण १०० कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळ, तेल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.
लाॅकडाऊनमुळे रोजंदारीवर वा रोजच्या कमाईवर जगणाऱ्या गरिबांवर उपासमारीची वेळ आली आहे.
ईशान्य मुंबई जिल्हा जनता दलाने सुरूवातीपासूनच अशा गरजू लोकांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. जिल्हाध्यक्ष संजीवकुमार सदानंद आणि त्यांचे सहकारी श्रीमती मलिका दुरई, रिक्षा संघटनेचे धोंडीराज, तसेच प्रविण, शिवकुमार, अॅन्थनी दास, मिहीर, कार्तिक कोनार आदींनी प्रसंगी धोका पत्करत रस्त्यावर उतरून भांडुप पश्चिम परिसरात गरजवंतांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे.
प्रारंभी परिसरातील गरजूंना शिधा देण्यात आला, ३००हून अधिक कुटुंबाना याचा लाभ मिळाला. नंतर पक्षातर्फे तयार जेवणाचे पॅकेट पुरविण्यास सुरुवात करण्यात आली. जवळपास आठ दिवस रोज साधारण ४०० लोकांना जेवण देण्यात येत होते. कुटुंबापासून दूर आणि एकट्या राहणाऱ्या कामगारांची त्यामुळे मोठी सोय झाली.
या कामासाठी संजीवकुमार सदानंद यांच्या वडिलांच्या नावाने असलेल्या कृष्णन सदानंदन एज्युकेशन ट्रस्टचीही मोठी मदत झाली. या कामाची राज्य सरकारच्या पातळीवरही दखल घेतली गेली आहे. कारण भांडुप परिसरातील रहिवाशांना धान्य वितरित करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने या ट्रस्टकडे विचारणा केली होती.
त्यानुसार या ट्रस्टच्या वतीने अन्न महामंडळाकडे प्रत्येकी एकेक हजार किलो गहू व तांदळाची मागणी नोंदविण्यात आली होती. तसेच अपना बाजार कडे प्रत्येकी ३०० किलो डाळ व खाद्य तेलाची मागणी नोंदविण्यात आली होती. यातून पुन्हा गरजू लोकांना मदत देण्यात आली. काल बुधवारी भांडुप पश्चिम,गावदेवी रोड येथील साधारण १०० कुटुंबांना गहू, तांदूळ, डाळ, तेल आदी साहित्याचे वाटप करण्यात आले. यात शासकीय यादीतील सुमारे २५ गरजूंच्या समावेश होता.यावेळी संजीवकुमार सदानंद हे स्वतःही हजर होते.
त्याआधी कोरोना प्राथमिक तपासणीचे दुसरे शिबीर पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. याचाही १००हून अधिक रहिवाशांनी लाभ घेतला.