<
कळंब, प्रतिनिधी
कळंब तालुक्यात गुरुवारी सायंकाळी तीन कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांवर कळंब मधील उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू होते दरम्यान त्यांच्या संपर्कातील जवळपास २३ नागरिकांचे स्वॅब नमुने घेतले असून त्यातील आठ जणांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी लातूर येथील वैद्यकीय महाविद्यालयाकडे पाठविण्यात आले आहेत. दरम्यान, कोरोनाबाधीत तीनपैकी एका रुग्णाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यास सोलापुरला हलविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी दिली आहे.
गुरुवारपर्यंत कळंब तालुक्यातील दोन हजार ८६१ एवढ्या नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यातील ९७३ जणांना संस्थात्मक विलगिकरण करण्यात आले आहे, तर उर्वरित एक हजार ८८८ नागरिकांना घरातच विलगीकरण करण्यात आले आहे. तर २६९ जणांना घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत ६३३ नागरिकांचे स्वॅब नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. आणखी ३२ जणांचे अहवाल अद्याप मिळालेले नाही.