<
पुणे, दि. १६ : सध्याच्या लॉकडाऊन काळात पुणे विभागात अन्नधान्य व भाजीपाल्याचा पुरेसा पुरवठा झाला आहे. विभागात अंदाजे ३० हजार ७७५ क्विंटल अन्नधान्याची तर १० हजार २४९ क्विंटल भाजीपाल्याची आवक मार्केटमध्ये झाली आहे. विभागात ६ हजार ३६२ क्विंटल फळांची आवक तसेच कांदा-बटाट्याची आवक ९ हजार १७९ क्विंटल इतकी झाली आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागात १५ मे २०२० रोजी १०१.६० लाख लिटर दुधाचे संकलन झाले असून २३.८१ लाख लीटर दुधाचे पॅकेजिंग स्वरुपात वितरण झाले आहे. तर उर्वरित दूध सुट्टया स्वरुपात वितरित करण्यात आले आहे, असेही डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.
पुणे विभागात १० हजार ५११ स्थलांतरित मजुरांना निवारा तर ६४ हजार ८४६ मजुरांना भोजनाची सोय
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी जिल्हा प्रशासनामार्फत ९३ कॅम्प, कामगार विभागामार्फत ५६ कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत ११ कॅम्प असे पुणे विभागात एकुण १६० रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. या कॅम्पमध्ये १० हजार ५११ स्थलांतरित मजूर असून ६४ हजार ८४६ मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.