<
पालकमंत्र्यांच्या हस्ते शिधापत्रिका नसलेल्या गरीब, गरजू नागरिकांना जीवनावश्यक वस्तू कीट वाटप
नागपूर, दि. 16 : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील कोणाही उपाशी राहणार नाही, याची अन्न नागरी पुरवठा विभागाने दक्षता घ्यावी, अशा सूचना ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिल्या.
अन्न नागरी पुरवठा विभागातर्फे नागपूर शहरातील शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना त्यांच्या हस्ते प्रातिनिधक स्वरुपात जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. त्यावेळी डॉ. राऊत यांनी संबंधित विभागाला याबाबत सूचना केल्या.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, उपजिल्हाधिकारी श्रीमती हेमा बढे, अन्न नागरी पुरवठा अधिकारी भास्कर तायडे, अन्नधान्य वितरण अधिकारी अनिल सवई यावेळी उपस्थित होते. अन्न नागरी पुरवठा विभागाकडून शिधापत्रिका नसलेल्या गरीब, वंचित आणि अपंग, गरजू नागरिकांना तांदूळ, गहू, डाळ, तेल आणि इतर जीवनावश्यक वस्तू असलेल्या किट वाटप करण्यात आल्या.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाऊन लागू झाले तेव्हापासून राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा विभागाकडून जीवनावश्यक वस्तूंच्या कीटचे शहरातील सर्व झोनमध्ये वाटप करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 7 हजार 938 लाभार्थ्यांना कीट वाटप करण्याचे उद्दिष्ट असून, आतापर्यंत ३ हजार 619 कीट वाटप करण्यात आल्या आहेत. उर्वरीत कीट पुढील काही दिवसांत वाटप केल्या जाणार आहेत. या किटमध्ये 10 किलो तांदूळ, 10 किलो गहू तसेच डाळ आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.
पालकमंत्री डॉ. राऊत यांच्या हस्ते आज उत्तर नागपुरातील टेका झोनमधील 10, सदर 2 आणि धंतोली झोनमधील दोघांना प्रातिनिधीक स्वरुपात कीट वाटप करण्यात आले.
कम्युनिटी किचन
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या पुढाकारातून जिल्ह्यातील एकही गरीब, वंचित, गरजू नागरिक उपाशी राहणार नाही, यासाठी शहरातील ललित कला भवन येथे कम्युनिटी किचन सुरु करण्यात आले आहे. या कम्युनिटी किचनच्या माध्यमातून गरीब, वंचित व गरजू नागरिकांना भोजनाचे पाकीट घरपोच वाटप करण्यात येत आहेत. राज्यात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून आतापर्यंत सव्वासहा लाख गरजूंना दोनवेळचे जेवण बनवून पाकीट वाटप केले जात आहे. कम्युनिटी किचनमध्ये 300 स्वयंसेवक कार्यरत आहेत.