<
जळगांव(प्रतिनिधी)- महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन(मासु) ने पुन्हा एकदा राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांना युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे अश्या आशयाचे निवेदन दिनांक १५/०५/२०२० रोजी ई-मेल द्वारे सादर केले आहे. या निवेदनाद्वारे अजून काही अति महत्वाचे मुद्दे मासूने उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. उदय सामंत यांच्या निदर्शनास आणून दिले आहेत जे त्यांच्या दिनांक ०८/०५/२०२० रोजीच्या संबोधनातुन मांडले गेले नाहीत ते खालील प्रमाणे १.अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या सत्राच्या ATKT परीक्षा होणार होत्या पण आता त्या होऊ शकणार नाही मग अश्या विद्यार्थ्यांना आपण घेतलेला निर्णय लागू होणार का? कारण त्यांना पुन्हा परीक्षेसाठी डिसेंबर वा जानेवारीची वाट पाहावी लागेल अश्यात विद्यार्थ्यांना त्यांचे एक वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झालेली असून त्यांना नोकरीची संधीही दुरावणार आहे. २.अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या अगोदरच्या सत्राच्या ATKT परीक्षांचे पुनर्मुल्यांकनाचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत, जर हे निकाल वेळेवर लागले नाही अश्या विद्यार्थ्यांबद्दल कोणता निर्णय घेतला गेला किंवा घेण्यात येईल जेणेकरून विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल व त्यांना त्यांचे वर्ष वाया जाणार नाही याची खात्री पटेल.३.काही विद्यार्थी बॅकलॉग किंवा इयर ड्रॉप आऊट आहेत यंदा परीक्षा होत नसल्यामुळे त्यांना पुढच्या सत्रात म्हणजेच डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये ८ ते १० विषय एकत्र द्यावे लागतील त्यामुळे त्यांना ही त्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती निर्माण झालेली आहे मग अश्या विद्यार्थ्यां कोणता दिलासा मिळणार आहे ? (युजीसी) ने सादर केलेल्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ३ नुसार संस्थांच्या पातळीवर उपलब्ध मूलभूत पायाभूत सुविधा आणि विशेषत: दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना इंटरनेटची उपलब्धता पाहता या टप्प्यावर ऑनलाईन पद्धतीने परीक्षेचा अवलंब करणे शक्य नाही मग ऑफलाइन परीक्षा हाच पर्याय उपलब्ध राहतो म्हणजेच परीक्षा केंद्रावर जाऊन प्रत्यक्ष परीक्षा द्यायची पण परीक्षा घेण्यासाठी तत्पूर्वी अध्यापन (अभ्यासक्रम) पूर्ण होणे आवश्यक आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्यासमोर वरील मुद्दे मासूने नव्याने मांडलेले आहेत, श्री, उदय सामंत यांनी आणि राज्य समितीने यावर नक्कीच ठोस तोडगा काढला असेलच परंतु तो विद्यार्थ्यांपर्यंत पोहचल्या नसल्यामुळे त्यांच्या मनात मोठा संभ्रम आणि गोंधळ निर्माण झालेला असून विद्यार्थी हे मानसिक तणावाखाली वावरत आहेत. आम्ही नव्याने मांडलेल्या या मुद्द्यांकडे विशेष लक्ष देऊन विद्यार्थ्यांना न्याय द्यावा व त्यांना समान संधी देऊन युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सरासरी गुण प्रदान करण्यात यावे अशी नम्रतेची विनंती मासूचे संस्थापक अध्यक्ष अॅड.सिद्धार्थ सोनाजी इंगळे या निवेदनाद्वारे केलेली आहे. विद्यापीठ अनुदान आयोग (युजीसी) मार्गदर्शक सूचनेनुसार सर्वच विद्यार्थ्यांसाठी समान निर्णय घायचा होता पण मग अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी वेगळा नियम का लादण्यात आला ? असे प्रश्न मासूच्या प्रतिनिधींना असंख्य विद्यार्थ्यांमार्फत प्राप्त होत आहे याचे मुख्य कारण म्हणजे युजीसी मार्गदर्शक सूचनेमध्ये असे कुठेही नमूद नाही कि अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात. युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ चा जर विचार केला तर तो राज्यातील सर्व विद्यार्थ्यांसाठी समान आहे, याची आपण गंभीर दखल दखल घ्यावी अशी आम्ही कळकळीची विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे असे उत्तर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष -अरुण कवरसिंग चव्हाण यांनी सांगितले आहे. मासूच्या प्रतिनिधींना राज्यांतील विविध जिल्ह्यातून विद्यार्थ्यांचे फोन, मेसेजेस, ई-मेल येऊ लागले आहेत विद्यार्थी त्यांच्या अडचणी, मर्यादा आणि कोरोना मुळे लादले गेलेले निर्बंध यासगळ्या बाबी मासूच्या प्रतिनिधींसमोर मांडत आहेत. मासुद्वारे करण्यात आलेल्या विद्यार्थी सर्वेक्षणानुसार ८३% विद्यार्थी हे रेड झोन मध्ये वास्तव्यास आहेत तसेच ५९. ३ % विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलेले आहे कि त्यांचा ५०% अभ्यासक्रम लॉकडाउन सुरु होण्यापूर्वी पूर्ण झालेला आहे तर ५४. १ % विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आलेले आहे कि त्यांचा ०% अभ्यासक्रम लॉकडाउन नंतर ऑनलाईनपद्धतीने सुद्धा पूर्ण करण्यात आलेला नाही त्याचे मुख्य कारण म्हणजे सोयी सुविधांचा अभाव होय. यासाठी मासूने सुरु केलेला विद्यार्थी सर्वेचा पाय चार्ट सुद्धा यानिवेदनामध्ये अंतर्भूत केलेला आहे याची माहिती मासूचे उत्तर महाराष्ट्र प्रदेश संघटक श्री. आकाश वळवी यांनी दिली. लेनिस लोबो या अभियांत्रिकी अभ्याक्रमाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्याने श्री. उदय सामंत यांच्या ०८/०५/२०२० च्या घोषणेनंतर अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याबाबत एक ऑनलाइन याचिका सुरू केलेली आहे. लेनिस लोबोने सुरू केलेल्या ऑनलाइन याचिकेवर ४०००० हून अधिक विद्यार्थ्यांनी स्वाक्षरी केलेली आहे याची माहिती सुद्धा मासूने आपल्या निवेदनातून दिलेली आहे. आम्हाला ज्ञात आहे कि आपण २० जून पर्यंत परिस्थितीचा आढावा घेऊन यावर निर्णय घेणार आहात परंतु परिस्थितीमध्ये सुधार होण्याची कोणतेही चिन्हे दिसत नाहीत त्यामुळे लॉकडाउनचा कार्यकाळही वाढण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे असे सुतोवाचच भारताचे पंतप्रधान मान.नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दिनांक १३/०५/२०२० रोजी देशाला संबोधित करताना केले आहे यासाठी आपण आता विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा विचार करणे अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे अधिक विलंब न करता युजीसीच्या परीक्षेबाबतच्या मार्गदर्शक सूचना परिच्छेद क्रमांक ५ च्याआधारावर म्हणजेच मागील सर्व सत्राच्या कामगिरीच्या आधारावर अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना सरासरी गुण प्रदान करण्यात यावे व त्यांना दिलासा देऊन लवकर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी मासूने या निवेदनात केलेली आहे अशी माहिती जळगाव विभाग अध्यक्ष अॅड. अभिजित रंधे यांनी दिली. मासूने केलेल्या गूगल विद्यार्थी सर्वेक्षणानुसार राज्यातील विद्यार्थ्यांची परिस्थिती किती विदारक आहे हे आम्ही राज्य शासनाच्या अगोदरच लक्षात आणून दिले आहे, हजारो विद्यार्थी रेड झोन मध्ये अडकून पडले आहेत त्यामुळे ते परीक्षा केंद्रापर्यंत पोहचण्यात असमर्थ आहेत असे जळगाव जिल्हाध्यक्ष रोहन महाजन यांनी सांगितले.