कोरोनाची साथ संपविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला साथ द्यावी – पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर
अमरावती, दि. 17 : कोरोना साथीचे देश व राज्यावरील संकट संपविण्यासाठी लॉकडाऊन वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ही साथ संपविण्यासाठी नागरिकांनीही दक्षता पाळून शासन- प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ द्यावी, असे कळकळीचे आवाहन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे केले.
पालकमंत्री ॲड. श्रीमती ठाकूर यांचा आज वाढदिवस होता. मात्र, कोरोना साथीचे गांभीर्य ओळखून त्यांनी आज कुठेही न जाता व कुणालाही भेट न देता कुटुंबियांसमवेत राहणे पसंत केले. गर्दी टाळणे हा त्याचा हेतू होता. विविध क्षेत्रातील मान्यवर, नागरिक, कार्यकर्त्यांचे प्रेम आपल्याला सदैव लाभत आले आहे. फोन, मेसेज, व्हॉटस ॲप आदी विविध माध्यमांतून शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानते. कोरोना साथीमुळे सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक आहे. सर्वांनी ते पाळलेच पाहिजे. त्यामुळे आज कोणालाही भेटता आले नाही. मात्र, सर्वांच्या शुभेच्छा विविध माध्यमांतून पोहोचल्या आहेत. त्या आपल्यासाठी अमूल्य असल्याची भावना पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
प्रशासनाकडून विविध बाबींचा आढावा
दरम्यान, कोरोना साथीच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांबाबत पालकमंत्र्यांनी दूरध्वनीवरून प्रशासनाकडून माहिती व आढावा घेतला. जिल्ह्यात कोविड-19 विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक अत्यावश्यक उपाययोजना करण्यासाठी लॉकडाऊनच्या कालावधीत 31 मे 2020 पर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व विभागांनी या कालावधीत आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करावी. कुठेही शिस्तभंग होता कामा नये. हा निर्णय नागरिकांच्या व सार्वजनिक आरोग्याचे संरक्षण करण्यासाठी घेतला आहे. त्यामुळे सार्वजनिक हित लक्षात घेऊन आदेशाचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी प्रशासनाला दिले.
ॲक्टिव्ह रुग्णांची विशेष काळजी घ्या
कोरोना आजार उपचारांनी बरा होतो. जिल्ह्यात 62 नागरिक बरे होऊन घरी परतले आहेत. ही समाधानकारक व दिलासादायक बाब आहे. सध्या रूग्णालयात दाखल रूग्णांवर परिपू्र्ण उपचार व्हावेत. जिल्ह्यात सर्वेक्षण व तपासण्या नियमित होत आहेत. त्यात आढळून आलेल्या रूग्णांना वेळेत दाखल करून त्यांच्यावर दक्षतापूर्वक उपचार व्हावेत. त्यांना सर्व आवश्यक सुविधा मिळाव्यात. कुठेही हयगय होता कामा नये. कोविड रूग्णालयात दाखल रूग्ण बरे होत आहेत, ही सकारात्मक बाब आहे. कोविड रूग्णालय यंत्रणेने दाखल रूग्णांची विशेष काळजी घ्यावी, असे निर्देश पालकमंत्र्यांनी आज दिले.
त्यांनी आज जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांच्याशीही चर्चा करून माहिती घेतली व विविध निर्देश दिले.
अमरावती जिल्हा कोविड रूग्णालयातून 62 व्यक्ती बऱ्या होऊन परतल्या आहेत. कोरोना आजार हा योग्य उपचारांनी पूर्णपणे बरा होतो. त्यामुळे नागरिकांनी कुठलीही लक्षणे दिसताच तात्काळ शासकीय रूग्णालयात जाऊन तपासणी करून घ्यावी. हा आजार बरा होणारा असल्याने त्यात घाबरण्यासारखे काहीही नाही. आपण स्वत:हून माहिती दिली तर आपण स्वत:सह आपले कुटुंब, परिसर व समाजालाही सुरक्षित करू शकतो. त्यामुळे कुठलीही माहिती लपवू नये, असे कळकळीचे आवाहन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांनी यावेळी केले.