जळगाव – देशात कोरोनाच्या संसर्गाची व्याप्ती झपाट्याने वाढत असतांना त्याविरोधातील लढाईसुद्धा अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचली आहे यात पोलीस कर्मचाऱ्यांची भूमिका खूपच मोलाची आहे. कोरोनाच्या जनजागृती पासून ते शासन राबवित असलेल्या अनेक विविध शासकीय उपक्रम तसेच या टाळेबंदी मध्ये आहोरात्र बंदोबस्त मध्ये तप्तर असलेले आपले पोलीस बांधव भगिनीचे मोठ्या प्रमाणात सेवा देतांना दिसत आहेत. हे कोरोनाविरूध्दचे युद्ध जिंकण्यासाठी निर्णायक ठरते आहे.
देशवासियांचे भावनिक व मानसिक बळ वाढविण्याचे काम पोलीस कर्मचारी करीत आहेत. त्यांच्या या सेवाभावी व सामाजिक बांधिलकीच्या कामातून उतराई “रेडक्राँस” तर्फे फिरता दवाखाना प्राथमिक आरोग्य तपासणी उपक्रम गेल्या एक महिन्यापासून जळगावच्या विविध क्षेत्रात राबवित आहे. त्याच अनुषंगाने पोलिस अधिक्षक कार्यालयात पोलिस कर्मचाऱ्यांची रेडक्राँसच्या तज्ज्ञ व अनुभवी डॉक्टरांकडून प्रत्येकाचे शरीराचे तापमान- हृदयाचे ठोके, रक्तातील ऑक्सिजन संपृक्ततेचे प्रमाण (Oxygen Saturation) तपासणी व प्राथमिक आरोग्य तपासणी करून व मोफत औषधे देण्यात आली. अत्यंत धोकादायक व प्रतिकूल परीस्थितीत काम करीत असतांना घ्यावयाची काळजी, पथ्ये इ. बाबत समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी पोलीस अधिक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी तपासणी ठिकाणी येऊन “फिरता दवाखाना प्राथमिक आरोग्य तपासणी” उपक्रमाची माहिती, तपासणीच्या वेळी घेतली जाणारी काळजी तसेच या कोरोनाच्या संकटामध्ये रेडक्रॉसचे विविध सेवाभावी उपक्रमांची माहिती रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन व सचिव विनोद बियाणी यांच्या कडून जाणून घेतली. या तपासणी शिबिरात एकूण 520 कर्मचारी वर्गाने तपासणीत सहभाग घेतला. आजपर्यंत रेडक्रॉस च्या फिरत्या दवाखान्याच्या उपक्रमात 6804 नागरिकांची मोफत तापसणी त्यांना मोफत औषधोपचार ही करण्यात आला आहे.
या उपक्रमात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे व आपली प्राथमिक आरोग्य तापसणी करून घ्यावी असे आवाहन रेडक्राँसचे उपाध्यक्ष गनी मेमन, मानद सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, युथ/जुनियर रेडक्रॉस चेअरमन श्री. राजेश यावलकर, आपत्ती व्यवस्थापन चेअरमन श्री. सुभाष सांखला, डीडीआरसी चेअरमन श्री. जे. टी. महाजन यांनी केले आहे.
रेडक्रॉसचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर सोनवणे व डॉ. राजेश सुरळकर तसेच रेडक्रॉसचे जनसंपर्क अधिकरी सौ. उज्ज्वला वर्मा व स्वयंसेवक कामकाज पाहत आहेत.