उस्मानाबाद,दि.19(जिमाका):-राज्य शासनाने कोरोना विषाणूचा कोविड-19 प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा, 1897 दि. 13 मार्च 2020 पासून लागू करुन खंड 2, 3 व 4 मधील तरतुदीनुसार अधिसूचना निर्गमित केली आहे.यानुसार कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनेचा एक भाग म्हणून एका ठिकाणी होणारी नागरिकांची गर्दी व त्यामुळे होणारा संसर्ग टाळण्यासाठी दि.30 एप्रिल, 2020 च्या आदेशान्वये दि.3 मे, 2020 पर्यंत उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते.
तद्दनंतर दि.4 मे, 2020 च्या आदेशानुसार एफएल-II, सीएल- III, एफएलबीआर- II या अनुज्ञप्त्या चालू करण्याबाबतचे तर दि. 5मे, 2020 आदेशानुसार एफएल- II, सीएल- III, एफएलबीआर- II या अनुज्ञप्त्या बंद ठेवण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आले होते.आता दि.5 मे, 2020रोजीच्या आदेशात अंशत:बदल करुन खालील प्रमाणे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत.
मुंबई विदेशी मद्य नियम 1953 च्या नियम 70 (डी) अन्वये विहित केलेली मद्य बाळगणे, खरेदी करणे याच्या क्षमतेचा भंग होणार नाही याची संबंधित मद्यविक्रेत्यांने आवश्यक काळजी घ्यावी. कोणत्याही परिस्थितीत उघडलेल्या मद्य विक्रीच्या आस्थापनांमध्ये मद्य प्राशन होणार नाही याची दक्षता घ्यावी व अशी बाब आढळल्यास प्रचलित कायद्यातील तरतुदींनुसार कडक कारवाई करण्यात येईल.
अशा कोणत्याही दुकानाने सदर मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास त्याचे दुकान तात्काळ बंद करण्यात येईल व त्यांच्याविरुध्द प्रचलित कायद्यांतर्गत आवश्यक ती कार्यवाही करण्यात येईल. अनुज्ञप्तीधारकाने दुकानासमोर Barricading लावून घ्यावेत.अनुज्ञप्तीधारक, नोकरनामाधारक यांनी Hand Gloves (हातमोजे) चा वापर करावा.
प्रत्येक सिलबंद किरकोळ मद्यविक्री करणाऱ्या दुकानाच्या प्रवेशद्वारावर दर्शनी भागात सहजरित्या दिसेल असा फलक लावण्यात येईल.या फलकावर दुकानाच्या कामकाजाच्या सुधारित वेळा, एका वेळी दुकानासमोर 5 पेक्षा अधिक व्यक्ती असू नयेत.Social Distancing व Mask चा वापर अनिवार्य आहे.सर्व ग्राहकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येईल. ज्यास सर्दी,खोकला व ताप यासारखी लक्षणे आहेत, अशा व्यक्तींनी दुकानात प्रवेश करु नये.दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही.परिसरात थुंकण्यास सक्त मनाई आहे.
दुकानदाराकडून, ग्राहकांकडून नियमभंग झाल्यास त्यांचेविरुध्द प्रचलित कायद्यान्वये कडक कारवाई केली जाईल, अशा आशयाचा तपशील छापण्यात येईल.कोणतीही खाद्यगृह, मद्यविक्री आस्थापना अथवा केवळ बसून पिण्याची सोय असलेली आस्थापनामधूनमद्यविक्री होणार नाही.वरील मार्गदर्शक तत्वांचा अवलंब करण्याच्या अटींवर जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांनी त्यांना प्रदान करण्यात आलेल्या आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या अधिकारानुसार उस्मानाबाद जिल्ह्यातील नगरपरिषद हद्दीमधील मॉल्स,बाजार संकुल व बाजारातील मद्यविक्री दुकाने वगळून तसेच कंटेनमेंट झोन मधील मद्यविक्री दुकाने वगळून, जिल्ह्यातील इतर एफएल-II, सीएलएफएलटीओडी-III(वाईनशॉप), एफएलबीआर- II (बिअरशॉपी), सीएल-III (देशी दारु किरकोळ विक्री दुकाने) या अनुज्ञप्त्या दि.19 मे 2020 पासून सकाळी 8.00 ते दुपारी2.00 या वेळेत (सोमवार ते शनिवार या दिवशी) सुरु करण्याची परवानगी देत आहे.या मार्गदर्शक तत्वांचा भंग केल्यास आपत्ती व्यवस्थापन कायदा,2005 च्या कलम 51 ते 60 अन्वये तसेच भारतीय दंड संहितेच्या कलम 188 अन्वये गुन्हा दाखल होण्यास पात्र असलेला अपराध केला असे मानण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल.त्याच प्रमाणे अशा व्यक्ती किंवा संस्था महाराष्ट्र दारुबंदी कायदा व आपत्ती व्यवस्थापन कायद्यातील तरतुदीनुसार कारवाईस पात्र असतील. या आदेशाचा भंग झाल्याचे निदर्शनास आल्यास अनुज्ञप्ती तात्काळ रद्द करण्यात येईल.