चर्चगेट परिसरातील दिनशॉ वाच्छा मार्गावरील यशोधन इमारतीत कोविड १९ बाधित रुग्ण आढळल्यामुळे, या इमारतीतील फक्त चौथा मजला प्रतिबंधित (सील) करण्यात आला आहे. संपूर्ण इमारत प्रतिबंधित करण्यात आलेली नाही.
कोविड १९ संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना करताना सुधारित पुनर्रचनेनुसार, प्रतिबंधित क्षेत्र म्हणजेच कंटेनमेंट झोन’ व्यतिरिक्त ‘सीलबंद इमारती’ ही आणखी एक वर्गवारी करण्यात आली आहे. एखाद्या परिसरातील एका इमारतीमध्ये एक बाधित रुग्ण किंवा काही संशयित रुग्ण अथवा लक्षणे नसलेले रुग्ण (asymptomatic) आढळून आले असल्यास अशा इमारतीला किंवा त्या इमारतीच्या भागाला ‘सीलबंद’ म्हणून घोषित करण्यात येते. तसे करताना, बाधित (पॉझिटिव्ह) रुग्ण रहात असलेल्या सदनिकेची व इमारतीची परिस्थिती लक्षात घेऊन संबंधित इमारत किंवा इमारतीचा काही भाग ‘सीलबंद’ म्हणून घोषित करण्यात येतो.
याच निर्देशांच्या आधारे संपूर्ण यशोधन इमारत नव्हे तर या इमारतीतील फक्त चौथा मजला प्रतिबंधित/ सीलबंद करण्यात आला आहे.
अशा प्रकरणांमध्ये, इमारतीच्या / सोसायटीच्या व्यवस्थापकीय समितीस माहिती दिली जाते. त्याचबरोबर सोसायटीतील इतर व्यक्तींना बाधा होऊ नये, यासाठी राबवावयाच्या खबरदारीच्या उपाययोजनांबाबत सविस्तर माहिती व मार्गदर्शन करण्यात येते. या सर्व निर्देशांचे पालन करण्यात येत आहे.
प्रसारमाध्यमांकडून होत असलेल्या विचारणेच्या पार्श्वभूमीवर ही माहिती देण्यात येत आहे.