चोपडा (प्रतिनिधी)-युवा एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केन्द्र, जळगाव संलग्नित निमगव्हाण (ता चोपडा) येथील संस्था तापी फाऊंडेशन, व तांदलवाडी येथील सत्यं वद फाऊंडेशनच्या वतीने (इम्युनिटी) रोगप्रतिकारक शक्ती वाढविणा-या होमिओपॅथीक औषधीचे मोफत वाटप निमगव्हाण व तांदलवाडी या दोन्ही गावात करण्यात आले.
सध्या कोरोना रोगाचा वाढता प्रादुर्भाव पाहता व त्यावर कोणत्याही प्रकारची औषधी उपलब्ध नसतांना (इम्युनिटी) रोग प्रतिकारक शक्ती वाढविणे हाच एकमेव पर्याय असल्याने भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाने मान्यता दिलेल्या ‘अर्सेनिक अल्बम ३०’ ही होमिओपॅथीक औषधी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याचे कार्य करत असल्याने व नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने कोणतेही साईड इफेक्ट नसल्याने ग्रामस्थांच्या आरोग्याच्या दृष्टीने विचार करता या गोळ्यांचे दोन्ही गावात जवळपास ७५० कुटुंबाना मोफत वाटप करण्यात आले.
तापी पुलावरील तपासणी नाक्यावर कर्तव्यावर असलेले पोलीस, आरोग्यसेवक, शिक्षक, होमगार्ड आदी कोरोना योध्दांसह गावातील ग्रामपंचायत, वनविभाग, महावितरणचे कर्मचारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस यांना देखील या औषधीचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी अनिल शिवाजी बाविस्कर, प्रा.यशवंत पाटील, अरूण पाटील, सुनिल बाविस्कर, चक्रधर पाटील, निलेश पाटील, मधुकर खंबायत, प्रशांत बाविस्कर, धनंजय पाटील, विवेक पाटील, मोहन सोनवणे, शशिकांत धनगर, भिकन कोळी,रोहित धनगर यांनी सोशल डिस्ट्न्सींगचे पालन करून दोन्ही गावात घरोघरी जाऊन औषधीचे वाटप केले.
यासाठी श्री.दादा सेवा समिती व ग्रामविकास समितीचे सहकार्य लाभले.
उपक्रमाचे गावासह परिसरातील नागरिकांनी कौतुक केले आहे.