जळगाव(प्रतिनीधी)- आज आपण कोरोनाच्या सावटाखाली जगत आहोत. लाँकडाऊनमुळे दिनश्चर्या बदललेली आहे. भविष्याची चिंता सर्वांना सतावते आहे. अनामिक भितीने लोक भयभीत आहेत. ऐन लग्न सराईच्या दिवसात लाँकडाऊनमुळे लग्नसमारंभ व इतर धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. मंदीरांना कुलूप लागलेली आहेत. त्यामुळे निव्वळ भिक्षुकीवर मिळणारे दान व दक्षिणेवर तसेच मंदीरात पूजाअर्चा करून मिळणाऱ्या माधुकरीवर गुजराण करणाऱ्या भिक्षुकांच्या व पुजाऱ्यांच्या हाल अपेष्टांमध्ये कमालीची भर पडलेली आहे.
अशा भयंकर परीस्थितीत कृती फाऊंडेशनने अशा भिक्षुकांच्या व पुजाऱ्यांच्या झोळीत मदतीची दक्षिणा देऊन त्यांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला. शहरातील अशा गरजवंत भिक्षुकांना व पुजाऱ्यांना फाऊंडेशनच्यावतीने दैनंदिन जीवनातील आवश्यक किराणा सामानाचे वाटप केले आहे. तिलकवाडा जि.बडोदा(गुजरात) येथील प.पू.श्रीवासुदेवानंद सरस्वती आश्रमाचे स्वामी विष्णूगिरी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारातून हा उपक्रम राबविण्यात आला.”कृती फाऊंडेशन” चे अध्यक्ष प्रशांत महाजन, सचीव जी.टी.महाजन व पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी, समन्वयक गिरीश अपस्तंब, सीमा अपस्तंब, मोहन अपस्तंब, फिरोज शेख, चेतन निंबोलकर, डॉ.श्रद्धा माळी, डॉ श्रेयस महाजन यांच्या नेतृत्वाखाली व डॉ.विजय चौधरी यांच्या आर्थिक सहाय्याने हा उपक्रम राबविण्यात आला.