वर्धा , दि 21 (जिमाका):- कोरोनाच्या काळात प्रशासनाने अनेक आघाड्यांवर काम केले आहे. त्यातीलच एक संवेदनशील विषय होता तो म्हणजे परप्रांतीय मजुरांना थांबवून त्यांची संपूर्ण काळजी घेणे. त्यांना गावी पाठवताना त्यांना कोणतीही अडचण येणार नाही यासाठी सर्व व्यवस्था करण्याचे काम अतिशय नियोजनबद्धपणे तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी केले आहे . उत्तरप्रदेश मधील नूरपूर बीजनौर येथील कमलजीत सिंह यांनी स्वगावी पोहचल्यावर वर्धा तहसीलदार यांना “आपका मन से शुक्रगुजार हूँ, आप जैसे अधिकारी की इस भारत वर्ष को आवश्यकता है” असा संदेश पाठवून त्यांच्या कामाची एक प्रकारे पोचपावती दिली.
“नमस्कार मैडम हम समस्त उत्तर प्रदेश वासी आपकी सराहनीय सेवाओं के लिए आपका तहे दिल से अभिनंदन करते हैं तथा आपकी लंबी आयु के लिए प्रभु से कामना करते हैं! हमारे पूरे भारतवर्ष को आप जैसे अधिकारियों की ठीक आवश्यकता है अधिक कुछ ना कह कर मैं आपका मन से शुक्रगुजार करता हूं आपका भाई आपका शुभचिंतक कमलजीत सिंह। नूरपूर बिजनौर उत्तर प्रदेश”
प्रशासनात काम करीत असताना आपल्या कामाची दखल कार्यालयीन स्तरावर घेण्यात येते. त्यामुळे कामाचा हुरूप वाढतो. मात्र प्रशासनात संवेदनशीलपणे काम करताना अतिशय गरजू व्यक्तीना सेवेचा लाभ झाला आणि त्याबद्दल त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरचे भाव आणि आणि त्याला झालेला आनंद यापेक्षा दुसरा कृतार्थ भाव असू शकत नाही. प्रशासनातील कामाची हीच खरी पोचपावती ठरते.
कोरोनाच्या काळात 5 टक्के कर्मचारी उपस्थितीवर काम करत असताना अनेकांनी दिवस रात्र काम केले. मजुरांचे स्थलांतर आणि त्यांना थांबविणे हा एक आव्हानात्मक विषय होता. पण वर्धेत सामाजिक संस्थांच्या सहकार्याने हे काम प्रशासनाने पार पाडले . अनेक स्थलांतरित कामगार मजुरांना वर्धा जिल्ह्यात थांबविण्यात प्रशासनाला यश आले. 61 निवरागृहात 8 हजार 400 व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये बहुतांश जबाबदारी सामाजिक संस्था, कंपन्या आणि कंत्राटदारांनी उचलली. प्रशासनाने त्यासाठी आवश्यक सोई सुविधा ज्या सामाजिक संस्थांना करणे शक्य नव्हते त्यासाठी हातभार लावला. यामध्ये अनेक जण पुढे आलेत.
असाच महत्वाचा टास्क, अडकलेल्या कामगारांना आपापल्या राज्यात सुखरूप पोहोचविणे सुद्धा आहे. शासनाने परप्रांतियांसाठी बस, रेल्वे उपलब्ध करून देत त्यांना घरी जाण्यासाठी दिलासा दिला. यातही जिल्ह्यातील तहसीलदार नायब तहसीलदार यांनी निवारागृहातील कामगारांच्या व्यतिरिक्तही शहरातील अनेक नागरिक, विद्यार्थी यांना शोधून त्यांच्या राज्यात जाण्यासाठी त्यांना मदत केली.
त्या कामाचे कौतुक खुद्द आपापल्या घरी पोहचलेल्या अशाच कामगारांकडून झाल्यावर कामाचे चीज झाले अशी भावना वर्धेच्या तहसीलदार प्रीती डुडुलकर यांनी व्यक्त केली. त्यांना उत्तर प्रदेशच्या नूरपूर बीजनौर येथील कमलजीत सिंह या व्यक्तीने यांना संदेश पाठवून आभार व्यक्त केले. प्रशासनाच्या चांगल्या कामाची अनपेक्षितपणे मिळालेली ही पोचपावती आहे.