पंढरपूर : लॉकडाऊनमुळे जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी अडकलेले झारखंड येथील ९१८ नागरिक पंढरपूर रेल्वे स्थानकातून विशेष श्रमिक रेल्वेने झारखंडकडे रवाना करण्यात आले.
पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन दुपारी 2.00 वाजता झारखंडकडे ९१८ नागरिक रवाना करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी सचिन ढोले, तहसीलदार वैशाली वाघमारे, मंडलाधिकारी समीर मुजावर तसेच रेल्वे स्टेशनचे प्रबंधक जे.पी. चनगौड, वरिष्ठ अभियंता आर.एस गव्हाणे यावेळी सर्व प्रवाशांची आरोग्य तपासणी व थर्मल स्क्रिनिंग करण्यात आले. प्रशासनाकडून रेल्वेमध्येच पाणी व फुड पॅकेटची सोय करण्यात आली होती. रेल्वे डब्यात सामाजिक अंतर ठेवून त्यांची आसन व्यवस्था करण्यात आली होती. तत्पूर्वी पंढरपूर रेल्वे स्थानकात संपूर्ण रेल्वेचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते.
सदर रेल्वे झारखंडमधील जासिडीह येथे शनिवारी रात्री ०१.३० वाजता पोहोचणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
सोलापूर, लातूर तसेच सांगली जिल्ह्यातील विविध ठिकाणी अडकलेल्या झारखंड राज्यातील ९१८ नागरिकांना स्वगृही जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आली होती. यामध्ये माढा ८३, बार्शी ३६, मोहोळ ६७, पंढरपूर १३८, करमाळा १९६, सांगोला ७९, द.सोलापूर ८०, उ.सोलापूर-३०, अक्कलकोट ५०, माळशिरस २४, मंगळवेढा १८, तसेच लातूर-११, सांगली-५६, कवठेमंहाकाळ-०८, कडेगांव विटा ४२ अशा एकूण ९१८ नागरिकांना पंढरपूर रेल्वे स्थानकावरुन स्वगृही रवाना करण्यात आले.