२१४ लोकांना अटक; नवी मुंबई खांदेश्वर येथे नवीन गुन्ह्याची नोंद
मुंबई, दि. २२ : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये, काही गुन्हेगार व समाजकंटक गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने कठोर पाऊले उचलली आहेत. राज्यात सायबर संदर्भात ४०७ गुन्हे दाखल झाले असून २१४ व्यक्तींना अटक केली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली.
टिकटॉक, फेसबुक, ट्विटर व अन्य समाज माध्यमांवर चालणाऱ्या गैरप्रकारांसंदर्भात राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ४०७ गुन्ह्यांची (ज्यापैकी २२ N.C आहेत) नोंद २१ मे २०२० पर्यंत झाली आहे.
या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सॲप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७१ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, tiktok व्हिडिओ शेअर प्रकरणी १९ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटरद्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी ७ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ४४ गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत २१४ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .
नवी मुंबई खांदेश्वर
नवी मुंबई येथील खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे, सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या फेसबुक प्रोफाइलवर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून जिल्ह्यांमध्ये प्रवास करण्यासाठी e -pass मिळत आहेत व त्याकरिता तुम्ही एका विशिष्ट मोबाईल क्रमांकावर sms करा व त्यात स्वतःचा मोबाईल क्रमांक देऊन, पोस्ट टाकली होती. त्यामुळे परिसरातील लोकांमध्ये अफवा पसरून संभ्रम निर्माण झाला.
माहितीची सत्यता तपासा
सध्या लॉकडाउनच्या व कोरोना महामारीच्या काळात बरेच लोक सोशल मीडियाचा जास्त प्रमाणात वापर करत आहेत .सोशल मीडियावर बऱ्याच पोस्टमधून, वेगवेगळी माहिती दिलेली असते, यातील काही माहिती आपल्या विचारसरणीशी मिळती जुळती असते तर काही विरोधात असते. अशा कोणत्याही विचारसरणीच्या पोस्टवरच्या माहितीची सत्यता पडताळूनच सदर पोस्टवर आपली कमेंट करा व रिऍक्ट व्हा. अशा पोस्टवर रिऍक्ट होण्याआधी किंवा सदर पोस्ट शेअर करण्याआधी त्याचे काय परिणाम होऊ शकतात, आपल्या कृतीने कुठल्या कायद्याचा किंवा नियमांचा भंग होणार नाही याची खात्री करा. तसेच समोरच्या व्यक्तीस आपली पोस्ट व त्यातील मुद्दे पटले नाहीत तर सोशल मीडियावर वाद टाळा. लक्षात ठेवा भडकावणाऱ्या पोस्ट टाकणे, कोणावरही हीन दर्जाची टीका करणे, अफवा पसरविणे, चुकीची माहिती शेअर करणे, कोरोना महामारीबाबत चुकीच्या बातम्या, माहिती पसरविणे हे कायदेशीर गुन्हे तर आहेतच तसेच सामाजिक नियमांच्या विरुद्ध देखील आहे, असे आवाहन महाराष्ट्र सायबर विशेष पोलीस महानिरीक्षक यांच्यावतीने करण्यात येत आहे.