मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
भाजपाने आज सकाळी केलेल्या ‘माझं आंगण, माझं रणांगण’ ‘महाराष्ट्र बचाओ’ च्या आंदोलनाला मुलुंडकरांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाला असून मुलुंडमध्ये खासदार, आमदार व सहाही नगरसेवक भाजपाचे असूनही त्यांच्या कार्यालयातील मोजके कार्यकर्ते सोडले तर इतर कोठेही राज्यसरकारचा निषेध करण्यासाठी कोणीही आंदोलन केल्याचे चित्र दिसत नव्हते. सामान्य जनता या आंदोलनापासून दूरच राहिल्याचे चित्र सर्वदूर मुलुंडमध्ये दिसून आले.
‘राज्यातील जनतेला कोरोनापासुन वाचवण्यात अपयशी ठरलेल्या नाकर्त्या राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी भाजपातर्फे आज राज्यभरात ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलन करण्यात यावे, या आंदोलनात राज्यातील जनतेने आपापल्या घराबाहेर व कार्यालयाबाहेर निदर्शने करावी. काळे मास्क, काळे शर्ट, काळी रिबीन, काळे फलक हातात घेऊन सर्वांनी सरकारचा निषेध करावा’, असा आदेश देत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘माझं आंगण, माझं रणांगण’ ‘महाराष्ट्र बचाओ’ आंदोलनाची हाक दिली होती. परंतु मुलुंडमध्ये खासदार, आमदार व नगरसेवक भाजपाचे असतानाही मुलुंडकर नागरिकांनी या आंदोलनाला पाठ फिरवली. भाजपाच्या लोकप्रतिनिधी सोबत असलेले काही कार्यकर्ते, इतर पदाधिकारी व त्यांचे मोजके कार्यकर्ते असे सोडले तर इतर कोणीही राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी या आंदोलनात उतरलेले दिसत नव्हते. सकाळी ११ ते ११-३० पर्यंत करावयाच्या या आंदोलनात इमारतीतील रहिवासी किंवा भाजपा, आरएसएसचा चाहता वर्ग देखील उतरलेला दिसत नव्हता त्यामुळे मुलुंडमध्ये भाजपाच्या “महाराष्ट्र बचाओ” आंदोलनाचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसत होते.
याउलट महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मात्र राज्य शासनाला पाठिंबा देण्यासाठी सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय झालेले दिसत होते. महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राज्य शासनाच्या समर्थनार्थ फेसबूक, व्हाट्सअपवर निरनिराळ्या पोस्ट टाकलेल्या दिसत होत्या. व्हाट्सअप व फेसबुकवर अनेकांनी आपले डीपी फोटो बदलून राज्यशासनाच्या समर्थनाचे, मुख्यमंत्र्यांच्या समर्थनाचे डीपी ठेवलेले दिसत होते. सोशल मिडियावर भाजपा, देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील व त्यांच्या इतर नेत्यांची खिल्ली उडविणारे मेसेजस पोस्ट झालेले दिसत होते. शिवसेनेच्या सर्वच कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व राज्यशासनाच्या समर्थनार्थ आपले डीपी फोटो ठेवलेले होते.
सामान्य जनतेने मात्र या भाजपाच्या आंदोलनात कोणताही सहभाग नोंदवला नाही व पाठिंबा दिला नाही. उलटपक्षी अनेक सामान्य नागरिकांनी ही वेळ राजकारण करण्याची नसून राज्यशासनाच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहून कोरोनाला राज्याबाहेर व देशाबाहेर हद्दपार करण्याची आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासन चांगले काम करीत आहे, असे मत नोंदविले. तर काही नागरिकांनी कोरोनाला संपविण्यासाठी भाजपाने देखील राज्यशासनाला साथ देण्याची हातात हात घालून काम करण्याची जरूरत आहे, असे सांगितले. राज्यशासनावर विश्वास दर्शवत राज्य शासनाच्या पाठिंब्याचे पोस्ट टाकत नागरिकांनी भाजपाच्या “महाराष्ट्र बचाओ” आंदोलनातील हवा काढून टाकल्याचे चित्र मुलुंडमध्ये आज दिसून आले.