कळंब, प्रतिनिधी | हर्षवर्धन मडके
उस्मानाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्ण सापडलेला कंटेन्मेंट भाग वगळता सर्व दुकाने व आस्थापना या सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी दिले असून हे आदेश 31 मे पर्यंत लागू असतील. सर्व अत्यावश्यक सेवा व बाबी वगळता सायंकाळी 7 ते सकाळी 7 या वेळेत नागरिकांच्या हालचालीवर कडक प्रतिबंध राहतील. सोमवार ते रविवार सर्व दिवस सर्व दुकाने सुरू राहतील त्याच बरोबर दारू विक्रीची दुकाने सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
उस्मानाबाद जिल्हाधिकारी 22 मे रोजी जिल्ह्यातील कोण कोणती दुकाने, व्यवसाय व सेवा सुरू राहतील याबाबत सविस्तर आदेश जारी केले असून कोरोना रुग्ण सापडलेल्या भाग कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्याचे अधिकार हे उपविभागीय अधिकारी यांना प्रदान करण्यात आले आहेत. कंटेन्मेंट झोन मधील सर्व आस्थापना या बंद राहणार असून अत्यावश्यक सेवा मात्र सुरू राहतील त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आरोग्य सेतू ॲप्सचा वापर करण्याचे आवाहन केले आहे उस्मानाबाद जिल्ह्यातील क्रीडा संकुले व स्टेडियम तसेच इतर सर्व सार्वजनिक मोकळ्या जागा वैयक्तिक व्यायाम व सरावासाठी सकाळी 7 ते सांयकाळी 7 ये वेळेत खुल्या राहतील मात्र तेथे प्रेक्षकांची उपस्थिती असणार नाही तसेच सांघिक क्रीडा प्रकारांना परवानगी असणार नाही व्यायाम शाळा व जिम मात्र बंद असतील.
उस्मानाबाद जिल्ह्यातील कंटेनमेंट झोन वगळता सर्व मार्केट व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत खुली राहतील. जिल्ह्यातील पेट्रोल पंप हे सकाळी 8 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील तर उस्मानाबाद शहरातील पोलीस वेल्फेअर विभागाचा पेट्रोल पंप 24 तास चालू राहील. राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील पेट्रोल पंप दररोज 24 तास सुरू राहतील,जिल्ह्यातील बेकरी व स्वीट मार्ट दुकाने दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत चालू राहतील व सायंकाळी 5 ते 7 या वेळेत घरपोच सेवा देण्यास परवानगी राहील. सर्व प्रकारची औषधे दुकाने 24 तास सुरू राहतील तर बी-बियाणे व व खते या कृषी निविष्ठांची विक्री दुकाने व दुरुस्ती दुकाने सकाळी आठ ते सायंकाळी सहा वेळेत सुरू राहतील. कृषी उत्पन्न बाजार समितीमधील सर्व आस्थापना सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत सुरू राहतील. हॉटेल रेस्टॉरंटमधून सकाळी 9 ते सायंकाळी 7 यावेळेस घरपोच सेवेला परवानगी असेल, किराणा दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत चालू राहतील. भाजीपाला मार्केट व दूध केंद्र हे सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेत चालू राहतील,राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील धाबे हे 24 तास सुरू राहतील मात्र पानटपरी व तंबाखूजन्य पदार्थांची दुकाने मात्र बंद राहतील. दुचाकी वाहनावर एक जण तर तीन चाकी व चार चाकी वाहनात 3 व्यक्तींना प्रवास करता येणार आहे.
उस्मानाबाद जिल्ह्यातील अंतर्गत बससेवेला परवानगी असेल मात्र कंटेनमेंट फोनमधील बसवा चुकीच परवानगी नाही बस स्थानकावरील उपहारगृहे चालू ठेवण्यास परवानगी नाही उस्मानाबाद जिल्ह्यातील सलून व कटिंग ची दुकाने चालू करण्यात परवानगी देण्यात आली असून सकाळी 9 ते ते सायंकाळी 5 या वेळेत ही दुकाने सुरू राहतील उस्मानाबाद जिल्ह्यातील ज्या l अस्थापना सुरू राहतील त्यामध्ये कोरोना बाबत प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी करणे बंधनकारक असणार आहे.