<
चंद्रपूर येथील ५० वाघांचे लवकरच स्थानांतरण
मुंबई, दि. २३ :- राज्यातील वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्यासाठी लवकरच नवीन धोरण आणणार असल्याचे वनमंत्री संजय राठोड यांनी सांगितले. वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे तसेच राज्यातील काही वाघांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थानांतरण या दोन्ही बाबींवर उपाययोजना सुचविण्यासंदर्भात वनमंत्री श्री. राठोड यांच्यासमोर वनभवन नागपूर येथे सादरीकरण करण्यात आले. त्यावेळी मंत्री श्री.राठोड यांनी ही माहिती दिली. प्रधान मुख्य वन संरक्षक श्री. काकोडकर व अन्य अधिकारी यावेळी उपस्थित होते.
मंत्री श्री. राठोड म्हणाले, 1 जानेवारी 2020 ते 20 मे 2020 या कालावधीत राज्यात वेगवेगळ्या घटनांमध्ये वाघांच्या हल्ल्यात 12 जणांचा तर एका अन्य वन्यप्राण्याच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा अशा एकूण 13 जणांचा मृत्यू झालेला आहे. तसेच काही ठिकाणी माणसांच्या हल्ल्यामध्ये किंवा इलेक्ट्रीक तारेचा स्पर्श झाल्यामुळे वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर वन्यजीव – मानव संघर्ष कमी करण्याच्या दृष्टीने तातडीच्या उपाययोजना करण्यात येत आहेत.
राज्यात एकूण 312 वाघ आहेत. त्यापैकी एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 160 वाघांचे अस्तित्व आहे.चंद्रपूर शहरापासून केवळ पाच किलोमीटरच्या परिघामध्ये 21 वाघांचा संचार आहे.त्यामुळे याठिकाणी वन्यजीव- मानव संघर्ष मोठ्या प्रमाणात दिसून येतो. त्यातच येत्या वर्षभरात या परिसरात आणखी 60 नवीन वाघाच्या बछड्यांची भर पडणार आहे. त्यावर उपाय म्हणून चंद्रपूर जिल्ह्यातील 50 वाघांचे इतर जिल्ह्यातील जंगलात स्थानांतरण कशा प्रकारे करता येईल याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली. या 50 वाघांना ज्या जंगलात सोडणार येणार आहे त्या जंगलामध्ये सर्वप्रथम तृणभक्षी प्राण्यांची संख्या वाढवावी लागेल याबाबतही या बैठकीत चर्चा झाली. वन्यजीव – मानव संघर्ष कमी करणे आणि वाघांच्या स्थानांतरण संदर्भात राज्य वन्यजीव मंडळासमोर लवकरच प्रस्ताव सादर करण्यात येईल आणि धोरण निश्चित करण्यात येईल, अशी माहितीही वनमंत्र्यांनी यावेळी दिली.