<
पुणे,दि.२३ : पुणे विभागातील पुणे, सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या पाच जिल्ह्यातील कोरोना उपचार करणाऱ्या हॉस्पिटलचे व्यवस्थापन, रुग्णवाहिका व्यवस्थापन तसेच इतर वैद्यकीय सुविधांचे व्यवस्थापन व इतर आवश्यक माहिती अद्ययावत ठेवण्यासाठी तयार केलेल्या कोविड केयर सॉफ्टवेअरचे प्रकाशन उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
विधान भवनच्या ‘झुंबर हॉल’ मध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली ‘कोरोना’ संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने अधिकाऱ्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत या या सॉफ्टवेअरचे प्रकाशन करण्यात आले.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जमाबंदी आयुक्त एस.चोक्कलिंगम, पुणे पोलीस आयुक्त के.व्यंकटेशम, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप विष्णोई, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड, पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हार्डिकर, सहकार आयुक्त अनिल कवडे, साखर आयुक्त सौरभ राव, पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंग, भुजल सर्व्हेक्षण संचालक कौस्तुभ दिवेगावकर, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, शांतनू गोयल, पोलीस अधीक्षक संदीप पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, ससूनचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र फाठक यांनी हे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. या सॉफ्टवेअरच्या मदतीने पुणे विभागातील कोरोना रुग्ण, उपचार, हॉस्पिटल व्यवस्था, रुग्णवाहिका व्यवस्था, रुग्ण असलेली क्षेत्रे याबाबत माहिती संकलन करणे सुलभ होणार आहे. या सॉफ्टवेअरबाबत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर व श्री.फाठक यांनी सविस्तर माहिती दिली. उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी या सॉफ्टवेअरच्या निर्मितीबाबत समाधान व्यक्त केले.