<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
पालिकेच्या टी वार्डमध्ये गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात रुग्ण संख्या वाढत असल्याने फ़क्त मुलुंड मधील कोरोनाबाधित रुग्णांच्या सोयीसाठी मुंबई महानगर पालिकेने मुलुंड पश्चिमेला असलेल्या जकात नाक्याच्या एक मजली प्रशासकीय इमारतीचे कोविड उपचार केंद्र मध्ये रूपांतर केले असून येत्या काही दिवसांत हे ११५ बेडचे कोविड उपचार केंद्र रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध होणार आहे.
गेल्या काही दिवसांत झपाट्याने रुग्ण संख्या वाढत गेल्याने मुलुंडची एकूण रुग्ण संख्या ५४० पर्यंत पोहचली आहे. सध्या अस्तित्वात असलेली मुलुंडमधील सर्व कोविड उपचार केंद्र भरलेली आहेत त्यातच गेल्या काही दिवसांत एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेल्या रुग्णांना ठेवण्यासाठी मुलुंडमध्ये उपचार केंद्र नसल्यामुळे चेकनाक्या जवळील जकात नाक्याच्या प्रशासकीय इमारतीत पालिकेने कोविड उपचार केंद्र बनवायला परवानगी दिली व पुढील काही दिवसांत हे कार्यान्वित होत आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना टी वार्डचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांनी सांगितले की, ‘कोरोनाचे सौम्य लक्षणे असलेल्यांसाठी आणि संशयितांसाठी हे कोविड उपचार केंद्र बनविण्यात आले असून सध्या ११५ बेड येथे ठेवण्यात आले आहेत त्यापैकी ८ बेडना ऑक्सिजनची लाईन देण्यात आली आहे. ४० बेड हे तळ मजल्यावर असून उर्वरित बेड हे पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आले आहे. लवकरच हे कोविड उपचार केंद्र सुरू होत आहे’.
दरम्यान सुरुवातीला मुलुंड मधील झोपडपट्टी परीसरात कोविड 19 चा फैलाव मोठ्या प्रमाणात झाला परंतु कालांतराने इमारत परिसरात देखील कोविड 19 तेवढ्याच प्रमाणात वाढत आहेत. वाशीच्या एपीएमसी मार्केटचे व्यापारी, भाजी विक्रेते या परिसरात मोठ्या प्रमाणात राहात असल्याने त्यांच्या कुटुंबियांना देखील कोरोनाची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे.
मुलुंड मधील १५ विभागात कंटेनमेंट झोन बनविण्यात आले असून ते पुढीलप्रमाणे:
इंदिरा नगर १, इंदिरा नगर २, इंदिरा नगर ३, अमर नगर, रामगढ़ गोशाळा रोड, विजय नगर, नवीन राहूल नगर, अशोक नगर, बाबू जगजीवन राम नगर, गवणी पाडा, नाहुर रोड वीर संभाजी नगर, आझाद नगर, शंकर टेकडी, इंदिरा कॉलनी, वैशाली कॉलनी. हे सर्व कंटेनमेंट झोन मुलुंड पश्चिम परिसरातील आहेत.