<
जळगाव(प्रतिनिधी)- पवित्र रमजानची ओढ सगळ्या मुस्लिम बांधवांना असते. इस्लामिक धर्मानुसार हा महीना म्हणजे “अल्लाह से इबादत” चा महीना असतो.रमजानचा हा महीना “ईद-उल-फितर “ने समाप्त होतो. हा दिवस सर्व मुस्लिम बांधवांसाठी हर्षोल्लासचा दिवस असतो.
स्वतः वर नियंत्रण व संयम ठेवण्याचा हा महीना असतो. आप्तस्वकीय व मित्रपरीवारासोबत शिरखुरमाचे सेवन करून रमजानच्या पर्वाची समाप्ती केली जाते. परंतु या वर्षी रमजानचे पर्व साजरे करतांना कोरोनाचे सावटं असल्याने अनेक गरीब मुस्लीम बांधवांना मर्यादा आलेल्या आहेत. कृती फाऊंडेशनने अशा मुस्लीम बांधवांना परम पवित्र रमजान ईदच्या पूर्वसंध्येला सुका मेवा वाटप करून जाती धर्माची बंधने उल्लंघून धार्मिक सहीष्णुता जपली आहे. लाँकडाऊनमुळे आर्थिक अडचणींचा सामना करीत असलेल्या शहरातील तांबापुरा या भागातील सुमारे ५० गरजू व गरीब मुस्लीम कुटुंबांना पवित्र रमजानची सांगता करण्यासाठी सुका मेवा जसे, (बदाम, काजू, खोबरे, चारोळी, किसमिस, खसखस इ.) वाटप करून रमजानचा आनंद द्विगुणित केला आहे. प.पू.श्री वासुदेवानंद सरस्वती आश्रम, तिलकवाडा(गुजरात) चे स्वामी विष्णूगिरी महाराज यांच्या प्रेरणादायी विचारातून हा उपक्रम कृती फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रशांत महाजन, सचिव जी.टी.महाजन, कार्याध्यक्ष अमित माळी यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आला. या उपक्रमाला चार्टर्ड प्रेसिडेंट डी.टी.महाजन, डॉ.श्रद्धा माळी, डॉ. श्रेयस महाजन, डॉ.विजय चौधरी, फिरोज शेख, चेतन निंबोळकर, यांचे सहकार्य लाभले. तसेच यंदाची ईद मुस्लिम बांधवांनी घरीच राहून साजरी करावी व प्रशासनाला सहकार्य करावे असे यावेळी फाऊंडेशनच्या वतीने सांगण्यात आले.