<
वरळी येथील नॅशनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया (एनएससीआय) येथील कोरोना काळजी केंद्रात ४० खाटांची अतिदक्षता उपचार सुविधा (आयसीयू) उभारणीचे काम वेगात सुरु असून महालक्ष्मी रेसकोर्स येथील कोरोना काळजी केंद्राची विविध कामेदेखील पूर्णत्वाकडे आहेत. उर्वरित कामे दोन दिवसात पूर्ण करुन शनिवार (दिनांक ३० मे २०२०) पासून या दोन्ही सुविधा कार्यान्वित करण्यात येतील, अशी ग्वाही महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगरचे पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांना दिली आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्यावतीने कोविड १९ प्रतिबंधात्मक कामकाज अंतर्गत सुरु असलेल्या विविध बाबींचा आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत नॅशनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे आज (दिनांक २७ मे २०२०) आढावा बैठक झाली. यावेळी महापालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल, अतिरिक्त महापालिका आयुक्त (शहर) श्री. संजीव जयस्वाल, विशेष कार्य अधिकारी तथा सनदी अधिकारी श्रीमती प्राजक्ता लवंगारे, सहआयुक्त (दक्षता) श्री. आशुतोष सलील, राज्याचे वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. तात्याराव लहाने, सहआयुक्त (आरोग्य) श्री. रमेश पवार, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री. शरद उघडे, डॉ. मुफ्फी लकडावाला, डॉ. श्रीमती नीता वर्टी आदी उपस्थित होते.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात विविध ठिकाणी उभारण्यात येत असलेल्या कोरोना काळजी केंद्र अंतर्गतच्या जम्बो फॅसिलिटी सुविधांबाबत प्रारंभी महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी पालकमंत्री श्री. ठाकरे यांना प्रगतीपर स्थितीची माहिती दिली. त्यासोबत महानगरपालिकेची प्रमुख रुग्णालये, उपनगरीय रुग्णालये, खासगी रुग्णालये व दवाखाने या सर्वांमध्ये करण्यात आलेल्या सेवासुविधा, तरतूद, रुग्णांना खाटा व रुग्णवाहिका जलदगतीने व समन्वयाने उपलब्ध करुन देण्याबाबत सुरु असलेली कार्यवाही आदींची सविस्तर माहिती दिली. वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये नेमण्यात आलेले सनदी अधिकारी करीत असलेली कार्यवाही, महानगरपालिकेची मदत दूरध्वनी सेवा, अतिदक्षता सुविधांमध्ये करण्यात येत असलेली वाढ, महानगरपालिका वैद्यकीय अधिकारी/कर्मचारी व इतर मनुष्यबळ यांच्या समस्यांचे निराकरणासाठी उचलण्यात आलेली पावले या निरनिराळ्या मुद्यांचा प्रगतिपर आढावाही यावेळी घेण्यात आला.
जी/दक्षिण विभागामध्ये नॅशनल स्पोर्टस् कॉम्प्लेक्स ऑफ इंडिया (एनएससीआय) येथे ५०० खाटांचे कोरोना काळजी केंद्र यापूर्वीच सुरु झाले आहे. तर विस्तारित सुविधा म्हणून आणखी १५० अशा एकूण ६५० खाटांची क्षमता येथे वापरात आहे. त्यात वाढ करुन ४० खाटांची अतिदक्षता उपचारांची सुविधा (आयसीयू बेड) जवळपास पूर्णत्वास आली आहे. त्यासोबत महालक्ष्मी रेसकोर्स येथे पहिल्या टप्प्यात ३०० खाटांची क्षमता असलेले कोरोना काळजी केंद्राचे काम ९० टक्के पूर्ण झाले आहे. यामध्ये १०० खाटा ह्या आयसीयू उपचारांसाठी आहेत. या केंद्राचा विस्तार म्हणून आणखी ५०० खाटांची उपलब्धता करण्याचे कामही वेगाने सुरु आहे. त्यासोबत आणखी १२६ आयसीयू खाटांची सुविधा उभारण्याचे काम सुरु करण्यात आले असून तेही १० ते १५ दिवसांच्या आत पूर्ण होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
विविध अडचणींवर मात करुन या उपाययोजना वेगाने सुरु असल्याबद्दल पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच या सुविधा लवकरात लवकर जनतेला उपलब्ध व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यावर, एनएससीआय येथील ४० खाटांची आयसीयू सुविधा व रेसकोर्स येथील प्रारंभिक ३०० खाटांची सुविधा ह्यांचे उर्वरित काम दोन दिवसात पूर्ण करुन शनिवार, दिनांक ३० मे २०२० पासून ते कार्यान्वित करण्याची ग्वाही आयुक्त श्री. चहल यांनी प्रशासनाच्यावतीने श्री. ठाकरे यांना दिली.