<
जळगाव(चेतन निंबोळकर)- तालुक्यातील नांद्रा बुद्रुक येथील ग्रामआरोग्य समितीतील सदस्य ग्रामसेवक व तलाठी यांनी शासनाचे नियम धाब्यावर बसवत गाव वाऱ्यावर सोडले आहे. लॉक डाऊनच्या काळात कोविड-19 आजाराने देशभरात कोरोना विषाणू ने थैमान घातले असून जळगाव जिल्हाधिकारी अविनाश ढाकणे यांनी ग्राम समितीतील सदस्यांना गावातच राहणे सक्तीचे केले असून तरी देखील गावातील ग्रामसेवक व तलाठी यांनी जिल्हाधिकार्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवत गावातुन काढता पाय घेतला आहे. नांद्रा बु. येथील ग्रामसेवक चंद्रभान रोकडे हे गेल्या पंधरा दिवसापासून गावात न येता गाव रामभरोसे सोडले आहे.
काही भागात लॉकडाउनला शिथीलता दिली असता. शहरी भागातून मोठ्या प्रमाणात गावात नागरिक येत असून त्यांना विलगीकरणाचे काम करण्यासाठी व गावकऱ्यांना कोविड-19 या आजारापासून सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामसेवक व तलाठी यांना गावात राहणे अनिवार्य आहे. तरी ग्रामसेवक व तलाठी हे गावात न राहता गावकऱ्यांच्या जीवाशी खेळत आहे. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी प्रतिनिधीने ग्रामसेवक चंद्रभान रोकडे व जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातील श्री. बोटे यांना फोन केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. तसेच गावातील ग्रामस्थ मच्छिन्द्र सोनवणे यांनी देखील पंचायत समितीतील विस्तारधिकारी श्री.ढाके यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी मी काहीच करू शकत नसल्याचे सांगून बोलणे टाळले. तरी सदर ग्रामसेवकाची चौकशी होऊन योग्य ती कारवाई व्हावी असे मत गावकऱ्यांनी यावेळी व्यक्त केले.