<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
भांडूपच्या तुलशेतपाडा येथील आईसीआईसीआई बँकेचे एटीएम सेंटर फोडून चोरट्यांनी तब्बल ११ लाख रूपये रोख रक्कम चोरून पोबारा केल्याची घटना दि २१ मे रोजी मध्यरात्री घडली होती व त्यासंबंधीची तक्रार दि २२ मे रोजी बँकेच्या प्रतिनिधीने भांडूप पोलिस ठाण्यात नोंदवली होती. सदर घटनेतील आरोपीचा कोणताही धागादोरा नसताना भांडूप पोलिसांनी शिताफीने शोध घेत दि २६ मे रोजी आरोपीला सोनापुर परिसरातून मुद्देमालासकट ताब्यात घेवून अटक केली व त्यांच्यावर भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आईसीआईसीआई बँकेच्या भांडूप येथील एटीएम सेंटर फोडी प्रकरणी कोणताही सबूत नसताना आरोपींचा शोध घेणे व मुद्देमालासह अटक करणे हे भांडूप पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलिसांनी याप्रकरणी एटीएम सेंटर मधील व आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीवी तपासूनही अज्ञात आरोपींबद्दल काहीही माहिती मिळत नव्हती. भांडूप पोलिस ठाण्याचे गुन्हे प्रकटिकरण शाखेचे पोलिस उपनिरीक्षक दिनेश बागूल, अंकुश वाघमोडे आणि पथकातील अंमलदार हे कौशल्यपूर्ण तपास करत असताना व खबऱ्यांची मदत घेवून शोधकार्ये करत असताना भांडुप परिसरातील राहूल जाधव उर्फ रावल्या व पप्पू सोनावणे उर्फ बबन्या यांचेकडे अचानक भरपूर रोकड आली असल्याची माहिती त्यांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे राहूल विलास जाधव यास २४ मे रोजी टँक रोड परिसरातून व पप्पू अर्जुन सोनावणे यास २६ मे रोजी सोनापुर परिसरातून ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनीच हा गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले. पुढील तपासात आरोपींकडून चोरी केलेल्या रक्कमेतील रु ८,७९,०००/- रोख रक्कम, गुन्ह्यांत वापरलेली रिक्षा क्र. एमएच०३/बीटी/१६६३ व एटीएम मशीन फोडण्यासाठी वापरलेला हातोडा हे हस्तगत करण्यात आले.
सदरची कामगिरी पूर्व प्रादेशिक विभागाचे अप्पर पोलिस आयुक्त लखणी गौतम व परिमंडळ ७ चे पोलिस उपआयुक्त परमजीतसिंग दहिया, भांडूप विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त बाळसाहेब कदम यांच्या सूचनेनुसार आणि भांडूप पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्याम शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दिनेश बागूल, अंकुश वाघमोडे आणि पथकातील अंमलदार सुनिल पवार, धनराज आव्हाड व संदीप लुबाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.