<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बँकेत गर्दी होवू नये म्हणून मुलुंड, भांडूप येथील बँकेत फ़क्त ३ ते ४ ग्राहक बँकेच्या आत असतील अश्या प्रकारे ग्राहकांना सोडण्यात येत असून इतर ग्राहकांना सुरक्षित अंतर ठेवून रांगेत बँकेच्या बाहेर उभे केले जात आहे. त्यामुळे मुलुंड, भांडूप परिसरातील सर्वच बँकेच्या बाहेर ग्राहकांची मोठी रांग लागलेली दिसत असून पूर्वी ५ ते १० मिनटात होणाऱ्या बँकेच्या कामासाठी ग्राहकांना आता अर्धा तासापेक्षा अधिक वेळ बँकेबाहेरील रांगेत उन्हात उभे राहावे लागत असल्याने अधिकतर ग्राहक विशेषतः जेष्ठ नागरिक व महिला वर्ग संतप्त होवून बँक व्यवस्थापनाची वाद घालत असल्याचे चित्र सर्वच बँकेच्या बाहेर दिसत आहे.
मुलुंड पूर्व येथील एका बँकेच्या बाहेर मोठी रांग लागल्याने ग्राहकांना अर्धा ते पाऊण तास रांगेत भर उन्हात उभे राहावे लागल्याने रांगेतील काही जेष्ठ नागरिकांनी बँकेच्या आत जावून बँक व्यवस्थापनाशी संतप्त स्वरात वाद घालायला सुरुवात केली. आतील कर्मचाऱ्यांच्या समोर एकही ग्राहक नसताना त्यांना कामाला लावायचे सोडून आम्हांला अर्धा ते पाऊण तास रांगेत उन्हात उभे करुन आपल्याला काय मिळते असा सवाल हे नागरिक विचारताना दिसत होते. पूर्वी ५ ते १० मिनटात होणाऱ्या कामासाठी आता आम्हांला अर्धा तासापेक्षा अधिक वेळ बँकेच्या बाहेर तिष्ठत उभे राहावे लागत आहे. रांगेतील ग्राहकांना व्यवस्थित मॅनेज केले तर बँकेबाहेर रांग लागणार नाही व ग्राहकांना देखील ताबडतोब काम आटोपून घरी जाता येईल असे बँक मॅनेजरला ग्राहक सांगताना दिसत होते. अखेर बँक मॅनेजरने या संतप्त ग्राहकांना शांत करुन रांगेचे योग्यरित्या व्यवस्थापन करण्याचे आश्वासन दिले व बँकेच्या बाहेर आपल्या एका कर्मचाऱ्याला उभे करुन ग्राहकांचे काम विचारून त्यांना संबंधित काउंटरवर पाठवून रांग कमी करण्यात यश मिळविले.
‘बँक व्यवस्थापनाने आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याला बँकेबाहेर ठेवून रांगेत उभे असणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला आपले काय काम आहे हे विचारून त्या ग्राहकांना आतील काउंटरवर रिकाम्या बसलेल्या बँक कर्मचाऱ्यांकडे पाठवले व ग्राहकांना तत्काळ सेवा दिली तर बाहेरील रांग देखील कमी होईल व आतील सर्वच कर्मचाऱ्यांना बँकेच्या ग्राहक वेळेत ग्राहकांच्या कामासाठी पूर्ण वेळ दिल्याचे समाधान मिळेल आणि अश्याने बँकेबद्दल व बँकेच्या कर्मचाऱ्यांबद्दल ग्राहकांच्या मनात देखील आपुलकी निर्माण होईल’ असे मुलुंडमधील बँक ग्राहक जेष्ठ नागरिक मनोहर पेडणेकर यांनी सांगितले. बँक व्यवस्थापनाने व्यवस्थापन कौशल्य वापरून रांगेतील ग्राहकांना व्यवस्थित मॅनेज केले तर ग्राहकांना उन्हात अर्धा ते पाऊण तास उभे राहायची आवश्यकता पडणार नाही अश्याने बँकेबाहेरील रांग देखील कमी होईल व बँकेच्या आत गर्दी देखील होणार नाही तसेच प्रत्येक काउंटरला ग्राहक मिळतील आणि बँक देखील काउंटरवरील आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना ग्राहक वेळेमध्ये ग्राहकांच्या सेवेस व्यस्त करु शकते तसेच बँकेबाहेर होणाऱ्या गर्दी कमी झाल्याने पोलिसांचा ताण देखील कमी होईल असे बँक ग्राहक आनंद वाघ यांनी यासंदर्भात सांगितले.