<
खान्देशातून ४६ स्पर्धकांनी नोंदविला सहभाग
चोपडा (प्रतिनिधी) – युवा एवं खेल मंत्रालय भारत सरकारच्या नेहरू युवा केंद्र, जळगाव संलग्नित निमगव्हाण (ता.चोपडा) येथील सेवाभावी संस्था तापी फाऊंडेशन तर्फे खान्देशातील वक्तृत्व पटूंसाठी खान्देशस्तरीय खुल्या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते.
सध्या देशभरात कोरोना विषाणूच्या साथीमुळे लाॅकडाऊन लागू आहे,
या पार्श्वभूमीवर कुणीही घराबाहेर न पडता
घरातच बसून त्यांच्यातील वक्तृत्व कलेला चालना मिळावी, विचारांचे आदान प्रदान व्हावे, त्यातूनच सोशल मिडियावर समाजप्रबोधन होवून, लाॅकडाऊनचा काळ सत्कारणी लागावा, या उद्देशाने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.
खान्देशातून ४६ स्पर्धकांनी सहभाग नोंदविलेल्या या ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत धुळे येथील प्राजक्ता सुधाकर पिंगळे हिने प्रथम पारितोषिक प्राप्त केले.
द्वितीय पारितोषिक जळगाव येथील रूपाली वडनेरे हिने तर तृतीय पारितोषिक चोपडा येथील सुयश ठाकुर याने प्राप्त केले.
उत्तेजणार्थ प्रथम क्रमांकाचे पारितोषिक प्रितम निकम (शहादा) व श्रृतिका पाटील (शहादा) यांना विभागून देण्यात आले तसेच उत्तेजणार्थ द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक धुळे येथील डाॅ.देवयानी गवळे हिने प्राप्त केले.
जळगाव नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक नरेंद्र डागर यांचे मार्गदर्शनाखाली स्पर्धा समन्वयक म्हणून धुळे येथील प्रेरणादायी युवावक्ते प्रा.सतिश अहिरे यांनी काम पाहीले तर स्पर्धेचे परीक्षक प्रा.सदाशिव सुर्यवंशी (धुळे), प्रा.संदीप पाटील (चोपडा) व उदय येशे (जळगाव) यांनी परीक्षण केले.
स्पर्धेत सहभागी स्पर्धकांनी ‘कोरोना’ मुक्त भारतासाठी माझी भूमिका, सर्वांगीण क्षेत्रात भारतीय महिलांनी घेतलेली झेप, राष्ट्र निर्माणासाठी युवकांची भूमिका, एका मताचे महत्व (मतदान), कोरोना काळात मला झालेले देवदर्शन आदी विषयांवर व्हीडीओच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण भाषणे केलीत.
स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे
प्रथम क्रमांकाचे रुपये १५०१, प्रमाणपत्र,
द्वितीय क्रमांकाचे रुपये १००१, प्रमाणपत्र,
तृतीय क्रमांकाचे रुपये ७०१, प्रमाणपत्र,
उत्तेजणार्थ प्रथम क्रमांकाचे रू ३०१, प्रमाणपत्र व
उत्तेजणार्थ द्वितीय क्रमांकाचे रू ३०१, प्रमाणपत्र देऊन विजेत्यांना गौरविण्यात आले.
तर सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी तापी फाऊंडेशनचे अनिल शिवाजी बाविस्कर, लिलाधर कोळी, दिपक बाविस्कर, दिपक सैंदाणै, लिलाधर बाविस्कर, पंकज सोनवणे यांच्यासह नेहरू युवा केंद्राचे स्वयंसेवक आकाश धनगर (जळगाव), निलेश बाविस्कर (चोपडा) यांनी परीश्रम घेतले.