<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मुलुंड पूर्व येथील टाटा काॅलनीतील सर्वधर्मीय स्मशानभूमीच्या बाहेर कोरोनाबाधित मृतदेहाच्या हाताळण्यासाठी वापरलेले पीपीई किट रस्त्यावर व नाल्यात पडलेले आढळल्याने टाटा कॉलनीतील नागरी परीसरात हलचल माजली असून नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्मशानभुमीच्या रस्त्यावर असलेले भटके कुत्रे जे टाटा कॉलनी परीसरात देखील वावरत असतात, त्यांचा या विषाणूबाधित पीपीई किटशी संपर्क आला तर संपूर्ण टाटा कॉलनीत कोरोनाचा संसर्ग पसरू शकतो या चिंतेने भयभीत होवून येथील नागरिकांनी टी वार्डमधील पालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना संपर्क साधून सदर घटनेची माहिती दिली व योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे.
टाटा कॉलनीतील मुस्लिम दफनभूमीत कोरोनाबाधित मुस्लिम मृतदेहांचे दफन करण्यासाठी आणण्यात येते.
मृतदेहांचे दफन झाल्यानंतर मृतदेहासोबत आलेले वार्डबॉय आपले पीपीई किट तेथेच टाकून पसार होतात. हवेने हे प्लास्टिक पीपीई किट बाजूच्या नाल्यात व रस्त्यावर पसरलेले टाटा कॉलनीतील नागरिकांना आढळून आल्याने रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. येथील मुस्लिम स्मशानभूमीत कोरोना बाधित मृतदेहाचे दफन होत असल्यामुळे आधीच तणावात असलेल्या या परिसरातील नागरिकांच्या चिंतेत येथील रस्त्यावर आढळून आलेल्या वापरलेल्या पीपीई किटमुळे भरच पडली. स्मशानभूमीच्या बाहेरील रस्त्यावर मृतदेहाच्या हाताळण्यासाठी वापरलेले हातमोजे, प्लास्टिक शीट आणि पीपीई किट पडलेले आढळल्याने परिसरातील नागरिकांनी ताबडतोब पालिकेच्या टी वार्डच्या आरोग्य अधिकाऱ्यांना व मुलुंड नवघर पोलिस स्टेशनला कळविले व योग्य ती कारवाई करण्याची विनंती केली.
टी वार्डचे स्मशानभूमीची जबाबदारी असलेले अधिकारी प्रकाश गाड यांनी घटनास्थळी भेट देवून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आणि गटारात, रस्त्यावर व इतरत्र पडलेले वापरलेले पीपीई किट जाळून टाकण्यात आले.
‘येथील मुस्लिम स्मशानभूमीत कोरोनाबाधित मृतदेह दफनासाठी आणण्यात येतात. मृतदेहाचे दफन पालिकेने नियुक्त केलेले वार्डबॉय अंगावर पूर्णपणे सुरक्षित पीपीई किट वापरून करतात. दफन झाल्यानंतर या वार्डबॉयने आपल्या अंगावरील पीपीई किटची योग्य शास्त्रशुद्ध पध्दतीने विल्हेवाट लावणे आवश्यक होते परंतु तसे न करता रस्त्यावर आणि नाल्यात टाकले असल्यामुळे संबंधित वार्डबॉयची माहिती काढून त्यांची चौकशी केली जाईल व योग्य ती कारवाई केली जाईल’ असे आरोग्य अधिकारी प्रकाश गाड यांनी सांगितले.
‘यापुढे असे कोणतेही कृत्य मृतदेह आणणाऱ्या वार्डबॉयकडून होणार नाही असे आश्वासन आरोग्य अधिकारी प्रकाश गाड यांनी दिले खरे परंतु प्रकाश गाड हे फ़क्त आश्वासन देतात बाकी काहीच करत नाही. मागील काही दिवसांत अनुभवलेली त्यांची कार्य करण्याची पद्धत यामुळे अकार्यक्षम आणि बेजबाबदार अधिकारी म्हणून प्रकाश गाड टी वार्डात प्रसिद्ध आहेत. ते कुठचेही काम चोख करत नाहीत त्यामुळे निष्क्रिय अधिकारी प्रकाश गाड काही ठोस पावले उचलतील याची बिलकूल शाश्वती नाही. आम्ही टी वार्डचे सहाय्यक आयुक्त किशोर गांधी यांच्याकडे देखील तक्रार केली असून टाटा कॉलनीतील नागरिकांच्या सुरक्षेसाठी व कोरोनापासून बचावासाठी पालिकेने तत्काळ कडक पावले उचलावीत अशी मागणी आम्ही त्यांना केली आहे’ असे टाटा कॉलनीतील नागरिकांनी सांगितले.