<
कळंब, प्रतिनिधी
उस्मानाबाद जिल्ह्यात दि. २८ मे रोजी पहिल्यांदाच कोरोना मुळे दोन रुग्ण दगावले आहे. उस्मानाबाद तालुक्यातील कोंड येथील एका ६० वर्षीय मयत वृद्धाचा अहवाल कोरोना पॉजिटीव्ह आला आहे. तर उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एका महिलेचा अहवालही पॉजिटीव्ह आला आहे. तर तसेच उमरगा तालुक्यातील बेडगा येथील एका कोरोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाला आहे. तो मुंबईहुन गावी आला होता. गंभीर बाब म्हणजे त्या रुग्णाच्या घरातील आणखी दोघेजण कोरोनाग्रस्त आहेत.
मरण पावलेल्या या कोरोनाग्रस्त रुग्णाचे वय ६७ असून तो मुंबईहून गावी आला होता. मुंबई मध्ये रिक्षा चालक म्हणून काम करणाऱ्या या रुग्णाला २५ मे रोजी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते तसेच त्याचा २६ मे रोजी कोरोना रिपोर्ट पॉजिटीव्ह आला होता तर दि. २८ मे रोजी त्या रुग्णाचा मृत्यू झाला. त्यास मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होता, त्यात कोरोना झाल्यामुळे त्याचा श्वासोश्वास कोंडत होता. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजाभाऊ गलांडे यांनी सांगितले.
उस्मानाबाद जिल्ह्यात आतापर्यंत ६४ जण कोरोना पॉजिटीव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी १५ जण कोरोणा मुक्त होऊन घरी परतले आहेत. तसेच सद्यस्थितीत ४७ रुग्ण उपचार घेत आहेत तर दोघांचा मृत्यू झाला आहे.