<
कळंब, प्रतिनिधी | हर्षवर्धन मडके
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव कमी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शनिवार आणि रविवार जिल्हा पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला. त्याच पार्श्वभुमीवर शनिवारी (दि.३०) जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात जिल्हाप्रशासनाच्या आदेशावर स्थानिक नगर परिषद व नगर पंचायत तसेच ग्राम पंचायत प्रशासनाने संपूर्ण बाजारपेठ दोन दिवस बंद ठेवण्याचे निर्देश दिले. त्यातच शनिवारी (दि.३०) सकाळपासूनच संपुर्ण जिल्ह्यात पुकारण्यात आलेल्या ‘जनता कर्फ्यु’ला जिल्ह्यातील जनतेने उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील व्यापारी प्रतिष्ठाने आणि इतर दुकाने सर्व बंद ठेवण्यात आली होती. भाजीबाजारासह किराणाचीही दुकाने बंद ठेवण्यात आल्याने रस्त्यावर शुकशुकाट बघावयास मिळाले.
वाढत चाललेली कोरोना विषाणुंची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी दिपा मुंढे यांनी शुक्रवारी (दि.२९) ‘जनता कर्फ्यु’चे आवाहन केले होते. या आवाहनाला जिल्हा व ग्रामीण भागातील नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतीने शुक्रवारी (दि.२९) गावांमध्ये दवंडी देऊन ‘जनता कर्फ्यु’ पाळण्याचे आवाहन केले. तर व्यापारी संघटनांनी सुद्धा यात सहभागी होत प्रतिसाद देण्यास नागरिकांना सांगितले. सोशल मीडियावरुन ही जनजागृती करून कोरोना व्हायरसच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वत्र उपाय योजना केली जात आहे. त्यानुसार, ‘जनता कर्फ्यु’ अंतर्गत शनिवारी (दि.३०) कळंब मधील मुख्य बाजारपेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक, ढोकी नाका, आंबेडकर चौक, रंगीला चौक परिसरातील रस्ते निर्मनुष्य झाले होते. त्यामुळे मुख्य रस्त्यांवरील वाहतुकही ओसरली होती.
त्याचप्रकारे, शिराढोण, मोहा , खामसवाडी, गोविंदपुर, वाघोली, इटकुर, शेळका धानोरा, येरमाळा, बोर्डा व लोहटा गावातही ‘जनता कर्फ्यु’ अंतर्गत कडकडीत बंद पाळून प्रतिसाद देण्यात आला. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील जनता सुद्धा घराबाहेर पडली नसल्याचे स्थानिक प्रतिनिधींकडून कळले. मस्सा, गौर, दहिफल, चोराखळी येथील सर्व आस्थापना बंद ठेवण्यात आले होते. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी शासना तर्फे आवश्यक ती पाऊले उचलली जात आहे. कोरोनाचा संसर्ग आणि गर्दी टाळण्यासाठी मेडिकल, दवाखाने, दूध वगळता इतर व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहे.
जिल्ह्यात नगर पंचायत प्रशासनाने आपल्या स्तरावर निर्णय घेत तालुकास्तरावरील सर्व बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश दिले.
चौकाचौकात पोलीस बंदोबस्त
‘जनता कर्फ्यु’ अंतर्गत कळंब शहरातील चौकाचौकांत पोलीस बंदोबस्त दिसून आला. विशेष म्हणजे, शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला असतानाच रस्त्यावर दिसणाऱ्यांची पोलिसांकडून विचारपूस केली जात होती. तसेच त्यांना तोंडावर रूमाल बांधा व लवकरात लवकर घरी जाण्याबाबत समजावून सांगीतले जात होते.
मोहा गावात नागरिकांचा शंभर टक्के सहभाग
मोहा : जिल्हाधिकारी दिपा मुंढे यांच्या आवाहनावरुन शनिवारी (दि.३०) सकाळ पासून गावातील लोकांनी आपली पूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवून या ‘जनता कर्फ्यू’मध्ये शंभर टक्के सहभाग घेतला. तर इतर लोकांनी आपल्या घरीच राहून जनता कर्फ्यूला सहकार्य केले.