<
जळगाव(प्रतिनिधी)- विवाह सोहळा हा एक मंगलमय व आनंददायी संस्कार. लग्न सोहळ्यात बडेजाव संस्कृतीचे प्रदर्शन करीत फारमोठा खर्च करण्यात येतो. परंतू विवाह सोहळा संगीतमय करणारे बँडवादकांना नेहमीच दुय्यम वागणूक मिळत असते. नेहमी दुर्लक्षित असलेल्या या घटकाची नोंद फारशी घेतली जात नाही. ऐन लग्न सराईच्या काळात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यावर्षी लग्न सोहळ्यांना ब्रेक लागलेला आहे. त्यामुळे या सोहळ्याशी निगडित फुलवाले, मंडप डेकोरेटर्स, केटरर, बँडवादक, परीवहन, पर्यटन, यासारख्या लहान मोठ्या व्यावसायिकांना फार मोठ्याप्रमाणात आर्थिक झळ बसलेली आहे. त्यातल्या त्यात लग्न सोहळा संगितमय करणाऱ्या बँडवादकांची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे.
हाताला काम नसल्याने परीवाराची गुजराण कशी करावी याची चिंता त्यांना भेडसावत आहे. अशातच कृती फाऊंडेशनने या दुर्लक्षित घटकांची नोंद घेऊन लाँकडाऊनच्या काळात त्यांच्या दु:खावर फुंकर मारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना दैनंदिन जीवनातील आवश्यक असलेल्या किराणा सामान व जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करून त्यांना काही अंशी दिलासा देण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृती फाऊंडेशनचे सचिव जी.टी.महाजन, अध्यक्ष प्रशांत महाजन व पोलिस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांच्या संकल्पेनेतुन कौस्तुभ दातार, मिलिंद डेरे पुणे यांच्या आर्थिक मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला. डॉ श्रद्धा माळी, डॉ श्रेयस महाजन, चेतन निंबोळकर, नीता चौधरी, फिरोज शेख, अकबर शेख आदीचे या उपक्रमाला सहकार्य लाभले.