<
जळगाव – (धर्मेश पालवे )- महाराष्ट्राचे तत्कालीन गृहमंत्री गोपीनाथ मुंडे यांनी मंजुरी देऊन ७ डिसेंबर १९९८ रोजी वरणगाव येथील पोलिस नप्रशिक्षण केंद्राचे भुमिपुजनही केले होते.त्यावेळी वरणगाव हे आ. खडसे यांच्या मतदार संघात होते, खडसे यांनी या प्रकल्पासाठी जमीन उपलब्ध करुन दिली होती.
त्यानंतर आघाडीचे सरकार आल्याने निधी मिळू शकला नव्हता. २०१४ मध्ये पुन्हा युतीचे सरकार राज्यात आल्याने खडसे यांनी या पोलीस प्रशिक्षण केंद्रासाठी निधी व पदेही मंजूर केली होती. केंद्राच्या प्राचार्यपदी तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांचे नावही निश्चित झाले होते. मध्यंतरी खडसे यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला.
या पोलीस प्रशिक्षण केंद्राला मिळालेली मंजुरी रद्द केली. तरीही खडसे यांनी पाठपुरावा सुरू ठेवला होता. दोन महिन्यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी राज्य राखीव पोलीस बल गट स्थापण्यास मंजुरी देण्याचे आश्वासन खडसे यांना दिलेले होते.
त्यानुसार ही मंजुरी मिळाली असताना यासाठी जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात तसेच राज्यातील मंत्रिमंडळात असलेले मा गिरीश महाजन यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत हा प्रकार म्हणजे ‘आयत्या पिठावर रेघोट्या’ असा प्रकार असल्याची टीका खडसे समर्थकांनी केली आहे. याबाबत सोशल मिडियावर मेसेज फिरत असल्याचे दिसून आले.माहिती कार्यालयाच्या बातमीत महाजनांना श्रेयजिल्हा माहिती कार्यालयाने केवळ मंज़ुरी मिळाल्याचे वृत्त माध्यमांना देणे अपेक्षित असताना पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या प्रयत्नाने ही पथक स्थापनेची मंजुरी मिळाली असल्याचा उल्लेख असलेले वृत्त प्रसिद्धीस दिले. त्यामुळे भाजपातील अंतर्गत राजकारणाने माहिती कार्यालयालाही वेठीस धरले गेल्याचे दिसून येत आहे.
जिल्ह्यात भाजपात खडसे व महाजन या दोन गटांमध्ये राजकीय डावपेचही खेळले जात असले तरीही जाहीर कार्यक्रमांमधून सर्व आलबेल असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र प्रथमच खडसेंच्या मतदार संघातील कामाचे श्रेय महाजनांनी घेतल्याने व खडसे समर्थकांनी त्यावरून महाजनांना सोशल मिडियावर ट्रोल केल्याने भाजपातील सुंदोपसुंदी उघड झाली आहे. याबाबत सत्यमेव जयतेच्या प्रतिनिधींनी मा. एकनाथराव खडसे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते दिल्लीत असल्याचे सांगितले जात आहे.