<
फैजपूर(किरण पाटिल)- वर्षभरातील सर्व एकादशीचे फळ देणाऱ्या एकादशीला पांडव किंवा भीमसेनी एकादशी म्हटले जाते. श्रीमदभागवत स्कंध १२ अध्याय १३ श्लोक १६ मध्ये सूत गोस्वामी नैमिशअरण्यातील ऋषींनी म्हणतात की, निम्नगानांयथा गंगा देवनाम अच्युतो यथा
वैष्णवानां यथा शंभु: पुराणानामिदं तथा। नद्यांमध्ये जशी गंगा, देवांमध्ये अच्युत भगवान श्रीकृष्ण, आणि वैष्णवांमध्ये जसे भगवान शंभू(शंकर), तसे सर्व पुराणांमध्ये भागवत पुराण श्रेष्ठ आहे. या भागवत पुराणानुसार भगवान श्रीकृष्ण हे सर्व अवतारांचे स्रोत आहेत. भगवान राम, नारायण आणि पंढरपूरचे विठुराय ही त्यांचीच विविध रूपे आहेत. ह्याच भगवान श्रीकृष्णांनी कलियुगात गौर अवतार धारण केला आणि भगवान बलराम निताई म्हणून प्रकट झाले. दोन वर्षांपूर्वी संत नगरी फैजपूर येथील इस्कॉन मंदिरात गौर निताईच्या विग्रहाचे आगमन श्रीधाम वृन्दावन येथून झाले. यापूर्वी अनेक वर्षांपासून वृंदावन मध्ये साधुसंतांकडून या विग्रहांची सेवापूजा चालू होती. पण सर्व फैजपुरवासीयांवर कृपा करण्यासाठी भगवंत फैजपूरच्या इस्कॉन मंदिरात स्थापित झाले. यावर्षी प्रथमच मंगळवारी पांडव निर्जल एकादशी निमित्त फळांचा राजा म्हणून ओळख असलेल्या आंब्याच्या आमराईमध्ये गौर निताई भगवंताला सजविण्यात आले आहे. आंब्यासह आंब्याची पाने देखील आरास म्हणून वापरण्यात आली आहेत. नंतर आंब्यांचा नैवेद्यही दाखविण्यात आला. ही आरास करण्यासाठी मंदिरातील भक्तांनी सोमवारी रात्रीपासूनच श्रीमान माधव प्रभूंच्या मार्गदर्शनामध्ये परिश्रम घेतले.निर्जल एकादशी निमित्त मंदिरात ‘हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे हरे राम हरे राम राम राम हरे हरे’ या महामंत्राच्या जप यज्ञासोबत श्रीमदभागवत व भगवद्गीता पाठ करण्यात आला. संपूर्ण विश्वाची कोरोना संकटातून मुक्तता होण्यासाठी विघ्नविनाशक नरसिम्ह भगवंताच्या चरणी नरसिम्ह कवच स्तोत्र गायन व विविध प्रार्थना करण्यात आल्या. नंतर भोग लागलेल्या आंब्यांचे प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. तरी सर्व भाविक भक्तांनी भगवन्नामाच्या स्वरूपात भगवंताच्या चरणांचा आश्रय घ्यावा, अशी विनंती इस्कॉन फैजपुरचे अध्यक्ष श्रीमान सचिनंदन प्रभू यांनी केली आहे.