<
2895 मेट्रिक टन खते, 478 क्विंटल बियाणे व 7638 कापूस बियाणे पाकिटांचे वाटप
जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : शासनाच्या बांधावर खते व बियाणे पोहोचविण्याच्या योजनेचा शेतकरी गटामार्फत जास्तीत शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा. तसेच खताची मात्रा व तांत्रिक माहितीच्या आधारे उत्पन्न वाढवावे. असे आवाहन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. शासन शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी सज्ज असल्याचेही त्यांनी सांगितले.
राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला “एक गट – एक वाण” या कृषी विभागाच्या उपक्रमांतर्गत ई-संवाद कार्यक्रमाद्वारे जिल्ह्यातील शेतकरी गटाच्या 750 शेतकरी व त्या – त्या तालुक्याचे कृषी अधिकारी यांच्याशी covid-19 च्या पार्श्वभूमीवर खते व बियाणे खरेदी करण्यासाठी गर्दी होऊ नये व शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्वक व योग्य दरात कृषी निविष्ठा सहज उपलब्ध होण्यासाठी शासनाच्या बांधावर खते, बियाणे या संकल्पनेनुसार शेतकरी गटांमध्ये जागरूकता निर्माण होण्याच्या दृष्टीने संवाद साधून सविस्तरपणे चर्चा केली व माहिती व अडचणी जाणून घेतल्या.
जळगाव जिल्ह्यात आजपर्यंत 2895 मेट्रिक टन खते, 478 क्विंटल बियाणे, 7638 कापूस बियाणे पाकीट वाटप करण्यात आले. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा बचत होत असून काळाबाजार होण्यापासून शेतकऱ्यांचा बचाव होत आहे. ज्यामधून 446 शेतकरी गट व 6696 शेतकऱ्यांना पोहोच खते बियाणे पुरवठा शेतकऱ्यांच्या बांधावर करण्यात आला आहे. त्यात आजच्या प्रसंगी 110 टन युरिया, 158 मे.टन फॉस्फेट, 62 मे.टन 10:26:26,30 मे. टन डीएपी असे एकूण 260 मेट्रिक टन खतांचे तर 460 कापूस पाकिटे, 210 मक्याच्या बॅगाचे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी बांधावर बियाणे व खते वाटप याचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा. प्रमाणातच खतांचा वापर करून वेळोवेळी कृषी विभागाचा सल्ला घेण्याचे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.
तसेच पालक मंत्री गुलाबराव पाटील यांनी या उपक्रमाद्वारे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांचा खर्च हा चांगल्या प्रकारे बचत होत असून सामाजिक अंतर पाळले जात असून covid-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आळा बसत आहे.
सकाळी 10.00 वाजता पाळधी येथे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते बांधावर खते व बियाणे वाटप करणाऱ्या गाड्यांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली तर जळगाव येथिल कृषी विभागाच्या प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात तालुक्यातील 3 शेतकरी गटांसाठी 2 वाहनांना हिरवी झेंडी दाखविण्यात आली. त्यानंतर “एक गट – एक वाण ” या कृषी विभागाच्या उपक्रमात शेतकरी गटांशी ई- सवांद साधून माहिती जाणून घेतली.
पाळधी व जळगावच्या कार्यक्रमा प्रसंगी धरणगाव पंचायत समितीचे सभापती मुकुंदराव ननवरे, जि. प. सदस्य पवन सोनवणे, प्रतापराव पाटील, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर , आत्माचे प्रकल्प संचालक मधुकर चौधरी, जि.प.चे कृषी विकास अधिकारी वैभव शिंदे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, जळगाव तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी , सचिन बर्हाटे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक अरुण तायडे, कृषी विभागाचे सुहास पाटील, संजय पवार, उदय झंवर, सचिन पाटील, सतीश बोरसे आदी उपस्थित होते.