<
जळगाव, दि. 4 (जिमाका वृत्तसेवा) : जळगाव जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी डेथ ऑडिट कमिटी स्थापन करण्याचे आदेश राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिले होते. त्यानुसार समिती गठित करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत.
कोव्हिड -19 विषाणूचा वाढता प्रादुर्भाव, कोव्हिड -19 बाधित वाढलेली रुग्ण संख्या तसेच वाढता मृत्युदर यांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री श्री. टोपे यांनी 3 जून 2020 रोजी जळगाव जिल्ह्याकरीता आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीत 2 जून,2020 अखेर जळगाव जिल्ह्यात 800 कोव्हिड -19 पॉझिटीव्ह व्यक्ती आढळून आलेले असून त्यापैकी 102 व्यक्ती मयत झाल्याचे निदर्शनास आलेले आहे. जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोव्हिड -19 बाधित, संशयीत व्यक्ती मयत होत असून सदर व्यक्तींचा मृत्यु कोणत्या कारणांमुळे झाला याचे परिक्षण (Audit) होणे गरजेचे आहे. असे मत मंत्री श्री. टोपे यांनी व्यक्त केले होते. तसेच जळगाव जिल्ह्यासाठी याबबत Death Audit Committee स्थापन करणेबाबत निर्देश दिले होते.
कोव्हिड -19 बाधित, संशयीत व्यक्तींच्या मृत्यूंचे परिक्षण (Audit) करण्याकरीता पुढील प्रमाणे Death Audit Committee स्थापन करीत आहे. डॉ. दीपक पाटील – अध्यक्ष -9890437833, डॉ. किरण मुठे – सदस्य – 9823081814, डॉ. धीरज चौधरी, – सदस्य- 9764184564, डॉ. चंद्रय्या कांते – सदस्य – 8080461072, डॉ. विजय गायकवाड – सदस्य सचिव – 9422274644 असे आहेत.
या प्रमाणे नियुक्त करण्यात आलेल्या Death Audit Committee ने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी :- संबंधित मयत व्यक्तीचे केस पेपरचे परिक्षण करुन संबंधित मयत व्यक्तीवर करण्यात आलेल्या वैद्यकीय उपचाराबाबत माहिती घेऊन निष्कर्ष काढणे. संबधित मयत व्यक्तींच्या नातेवाईकांशी संपर्क साधून सदर व्यक्तीस यापूर्वी अन्य कोणते आजार होते काय ? तसेच मयत व्यक्तीस यापूर्वी कोणती नियमित औषधे सुरु होती काय ? याची खात्री करणे. संबंधित मयत व्यक्तीस कोणत्या प्रकारचा त्रास होता, त्यांना याबाबत कोणत्या डॉक्टरांनी उपचार केले होते. याबाबतची सविस्तर माहिती घेऊन सदर व्यक्तीचा मृत्यु नेमका कोणत्या कारणामुळे झाला असावा याचा अभ्यास करणे. संबंधित मयत व्यक्तींवर उपचार होत असतांना तसेच उपचाराच्या नेमक्या कोणत्या स्तरावर Treatment Protocol मध्ये उणिवा आढळून आल्या होत्या किंवा कसे याची सविस्तर माहिती घेऊन सदर उणीवा दूर करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना सुचविणे, नियुक्त करण्यात आलेल्या समितीने आपला अहवाल आठ दिवसात या कार्यालयास सादर करावा. तसेच आवश्यकतेप्रमाणे लागणारे मनुष्यबळ पुरविणे, सर्व प्रकारची प्रशासकीय मदत उपलब्ध करुन देणे याची जबाबदारी निवासी उपजिल्हाधिकारी. जळगाव यांची राहील असे, जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.