<
जळगाव, दि.4 (जिमाका वृत्तसेवा) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोल्ड सीटी हॉस्पिटलचे अधिग्रहण करण्यात आले असून ते आता डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून कार्यरत राहील, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी काढले आहेत.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्य पत्रानुसार कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा 1897 हा 13 मार्च 2020 पासून लागू करून खंड 2,3 ते 4 मधील तरतूदीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना निर्गमित केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी हे त्यांच्या कार्यक्षेत्राचे कोव्हिड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्या अंमलात आणण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे.
जळगाव जिल्ह्यातील कोव्हिड -19 विषाणुमुळे बाधित व्यक्तीची वाढत असलेली संख्या लक्षात घेता व जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथे उपलब्ध असलेली आयसीयू बेडची क्षमता अपुरी पडण्याची शक्यता असल्याने खाजगी हॉस्पिटल व हॉस्पिटलचे अधिनस्त असलेले मनुयबळ, हॉस्पिटल मधील सर्व साधन सामग्री, ॲम्ब्युलन्स अधिग्रहीत करणे आवश्यक आहे.
कोव्हिड -19 विषाणुमुळे प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजनांचा भाग व कोव्हिड -19 विषाणुमुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या उपचाराकरीता आपत्कालीन व्यवस्था म्हणून “गोल्ड सिटी हॉस्पिटल, जळगाव हे हॉस्पिटल अत्यावयक बाब म्हणून Dedicated Covid Hospital म्हणून घोषित करीत असून या हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील 10 ICU बेडस सहीत एकूण 50 बेडस व सदर हॉस्पिटलचा सर्व मेडिकल / पॅरामेडीकल स्टाफसह सर्व सुविधा 5 जून,2020 गोल्ड सिटी हॉस्पिटलच, जळगाव यांचे परिचालन अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव यांचेमार्फत करण्यात येईल. तसेच अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव यांनी त्यांचे स्तरावरुन सदर हॉस्पिटलशी समन्वय ठेवण्याकामी एक डॉक्टरांची नियुक्ती करावी.
गोल्ड सिटी हॉस्पिटल, जळगाव यांनी आदेशाच्या दिनांकापासून हॉस्पिटलमध्ये भरती केलेल्या सर्व रुग्णांना आवश्यकते प्रमाणे डिस्चार्ज करावे व जेथे शक्य आहे अशा रुग्णांच्या बाबतीत त्यांना अन्य हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची कार्यवाही करावी. तसेच सदर हॉस्पिटलमध्ये आदेशाच्या दिनांकापासून केवळ कोव्हिड -19 विषाणुमुळे बाधित / संशयित रुग्ण दाखल करण्यात येतील. या व्यतिरिक्त अन्य कोणत्याही रुग्णास हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेता येणार नाही. गोल्ड सीटी हॉस्पिटल जळगाव यांनी प्रशासनाकडून वेळोवेळी निर्गमित करण्यात येणाऱ्या सूचना, निर्देश, आदेशांचे पालन करणे बंधनकारक राहील.
सदर आदेशाचे उल्लंघन अथवा भंग केल्यास सदर बाब ही आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005, भारतीय साथ रोग नियंत्रण अधिनियम,1897, भारतीय दंड संहिता, 1860 चे कलम 188 नुसार शिक्षेस पात्र राहील, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, डॉ. अविनाश ढाकणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.