<
जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) :- जळगाव येथील गणपती हॉस्पिटल या डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनाची (COVID 19) लक्षणे दिसून येत असलेल्या आणि गंभीर असलेल्या रुग्णांवर उपचारासाठी नऊ फिजिशियन व भूलतज्ज्ञांची सेवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. अविनाश ढाकणे यांनी अधिग्रहित करण्याचे आदेश दिले आहेत.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे, कोरोना विषाणूबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध असलेली आयसीयू बेडची क्षमता अपूर्ण पडण्याची शक्यता असल्याने 13 मे 2020 रोजी गणपती हॉस्पिटल आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल म्हणून घोषित करण्यात आले आहे. या हॉस्पिटलमध्ये फिजिशियन व भूलतज्ज्ञांची सेवा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे पुढील डॉक्टरांची सेवा पूर्णवेळ करीता गणपती हॉस्पिटल, जळगावकरीता अधिग्रहित करण्यात येत आहे.
या डॉक्टरांची नावे व सेवा कालावधी असा : डॉ. रवी कुकरेजा (फिजिशियन), डॉ. ललित पाटील (भूलतज्ज्ञ), 10 जे 14 जून 2020. डॉ. मनोज टोके (फिजिशियन), डॉ. हेमंत पाटील (भूलतज्ज्ञ), 15 ते 19 जून 2020. डॉ. अभिषेक फिरके, डॉ. सुनील तायडे, 20 ते 24 जून 2020. डॉ. उमंग पाटील, डॉ. कृष्णांत भोळे, 25 ते 29 जून 2020. डॉ. निखिल पाटील, डॉ वर्षा वारके, 30 जून ते 4 जुलै 2020. डॉ. किरण पाटील, डॉ. जयश्री राणे, 5 ते 9 जुलै 2020.
वरील डॉक्टरांनी सकाळी आठ वाजता नियुक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच ड्यूटी संपल्यानंतर दुसरे पथक येईपर्यंत काम पाहावे. सेवा कालावधीत व सेवा कालावधी संपुष्टात आल्यानंतरही क्वारंटाइन सुविधा पुरविणे, जेवण व निवासाची व्यवस्था आदींबाबतचा खर्च जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येणार आहे. याशिवाय सेवा कालावधीतील मानधन अदा करण्यात येईल. या आदेशाचे उल्लंघन केल्यास आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व भारतीय साथरोग नियंत्रण अधिनियम, भारतीय दंड संहितेनुसार संबंधित शिक्षेस पात्र राहतील, असेही जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी म्हटले आहे.