<
जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : संभाजी ठाकूर
जळगाव, दि. 9 (जिमाका वृत्तसेवा) : प्रधानमंत्री फसल बिमा योजना राज्यात पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा 2020- 2021, 2021- 2022, 2022- 2023 या तीन वर्षांकरीता मृग व आंबिया बहाराकरीता लागू करण्यात आली आहे. या योजनेत जळगाव जिल्ह्यासाठी मृग बहाराकरीता मोसंबी, चिकू, पेरू, डाळिंब व लिंबू या फळ पिकांसाठी, तर आंबिया बहारासाठी मोसंबी, डाळिंब, आंबा व केळी या फळ पिकांसाठी बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे यांच्यामार्फत राबविण्यात येणार आहे. जळगाव जिल्ह्यातील महसूल मंडळस्तर क्षेत्र घटक धरुन ही योजना फळ पिकांसाठी अधिसूचित मंडळांमध्ये राबविण्यात येईल, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर यांनी दिली आहे.
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी म्हटले आहे, फळ पीकनिहाय कमी पाऊस, पावसाचा खंड, जादा आर्द्रता व गारपीट या हवामान घटकाच्या धोक्यापासून निर्धारित केलेल्या कालावधीत शेतकऱ्यांना विमा संरक्षण पुरविण्यात येणार आहे. ही योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित फळ पिकासाठी ऐच्छिक राहील. अधिसूचित फळ पिकांपैकी एका फळ पिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग अथवा आंबिया बहारापैकी कोणत्याही एकाच हंगामाकरीता विमा संरक्षणासाठी अर्ज करता येईल (उदा. मोसंबी व डाळिंब). जे शेतकरी स्वत:च्या स्वाक्षरीसह योजनेत सहभागी न होणेबाबत घोषणापत्र देणार नाहीत त्या सर्व शेतकऱ्यांना योजनेत सहभाग बंधनकारक समजला जाईल. मृग बाहर 2020- 2021 करीता हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागाचे वेळापत्रक व विमा संरक्षित रक्कम, विमा हप्ता दर, योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत आदी तपशील पुढील प्रमाणे (अनुक्रमे पिकाचे नाव, विमा संरक्षित रक्कम हेक्टरमध्ये, विमा हप्ता रक्कम, अंतिम मुदत या क्रमाने) : पेरू, 60 हजार, 3000, 20 जून 2020. लिंबू, 70 हजार, 3500, 20 जून 2020. मोसंबी, 80 हजार, गारपीट- 26667, 4000, गारपीट- 1333, 30 जून 2020. चिकू, 60 हजार, 3000, 30 जून 2020. डाळिंब, 1,30, 000/-, गारपीट- 43,333/- 6500, गारपीट- 2167, 14 जुलै 2020.
या पीक विमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. ठाकूर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा मध्यवर्ती बँक, राष्ट्रीयकृत बँकेची शाखा, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उपविभागीय कृषी अधिकारी कार्यालय, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव, बजाज अलायन्झ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. पुणे, टोल फ्री क्रमांक 18002095858, दूरध्वनी क्रमांक 020- 66026666, ई- मेल [email protected] येथे संपर्क साधावा.