<
धुळे : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी आरोग्य व जिल्हा प्रशासनाने आणखी सतर्क होत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची तपासणी मोहीम राबवावी. नागरिकांना मास्क वापरणे सक्तीचे करावे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात दंडात्मक कारवाई करावी, असे निर्देश नाशिक विभागाचे महसूल आयुक्त राजाराम माने यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., महानगरपालिकेचे आयुक्त अजीज शेख, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, श्री भाऊसाहेब हिरे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. माणिक सांगळे, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश मिसाळ, जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय गायकवाड, उपविभागीय अधिकारी भीमराज दराडे (धुळे), डॉ. विक्रम बांदल (शिरपूर), उपजिल्हाधिकारी श्रीकुमार चिंचकर (भूसंपादन) आदींसह विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
आयुक्त श्री. माने म्हणाले, धुळे जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत आरोग्य आणि जिल्हा प्रशासनाने आणखी दक्षता बाळगण्याची आवश्यकता आहे. कंटेन्मेन्ट झोनमधील जास्तीत जास्त नागरिकांची आरोग्य तपासणी करावी. वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेने रुग्णांच्या स्वॅबचे अहवाल तातडीने उपलब्ध होतील, असे नियोजन करावे. विविध विभागांकडून मागविण्यात येणारी माहिती तत्काळ अपलोड करीत अद्ययावत करावी. तसेच केंद्र सरकार व राज्य शासनाच्या निर्देशांनुसार कोरोना विषाणूबाधित रुग्णांबाबत कार्यवाही करावी. याशिवाय कोरोनाबाधित रुग्णांसाठी आवश्यक औषधांचा पुरेसा साठा ठेवावा, असेही त्यांनी निर्देश दिले.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव वाढत असतानाही काही नागरिक सूचनांचे पालन करताना दिसत नाही. त्यामुळे मास्क न वापरणे, रस्त्यावर थुंकणाऱ्यांविरोधात आणि सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात यावी. तसेच कोरोना विषाणूची प्रारंभिक लक्षणे दिसताच नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रांत जाऊन तपासणी करुन घ्यावी, असेही आवाहन आयुक्त श्री. माने यांनी केले.
जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले, धुळे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना विषाणूचे २७५ रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी २५ जणांचा मृत्यू झाला असून १२३ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यात फिवर क्लिनीक सुरू करण्यात आली आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत प्रवासाचे २० हजार ३०१ ई- पास अर्ज मंजूर करण्यात आले. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेच्या माध्यमातून ११ हजार ४०० प्रवाशांची वाहतूक करण्यात आली. त्यात प्रामुख्याने परराज्यात जाणाऱ्या श्रमिकांचा समावेश होता. जिल्हा पुरवठा विभागाच्या माध्यमातून अन्नधान्याचे वितरण करण्यात येत आहे. १५ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून रोज सरासरी १५५० थाळींचा लाभ देण्यात येत आहे. रोजगार हमी योजनेची कामे सुरू आहेत, असेही जिल्हाधिकारी श्री. यादव यांनी सांगितले. कोरोनाचे जिल्हा नोडल अधिकारी डॉ. विशाल पाटील यांनी कोरोना बाधित रुग्णांवर करावयाचा औषधोपचार याविषयी, तर वैद्यकीय महाविद्यालयातील विशेष कार्य अधिकारी डॉ. दीपक शेजवळ यांनी कोरोना बाधितांच्या मृत्यूची कारणे याविषयी माहिती दिली.