<
जळगांव(चेतन निंबोळकर)- एकीकडे वाढीव वीज देयकांमुळे वीजग्राहक मेटाकुटीला आले असतानाच दुसरीकडे सर्रास वीजचोरी केली जात असून त्यांच्यावर कारवाईचे प्रमाण कमी आहे. वाढत्या वीजचोरीचा परिणाम सर्वसामान्य ग्राहकांवरही होत आहे. त्यामुळे भर भरून काढण्यासाठी त्याचा फटका सामान्य वीज ग्राहकांना बसतो. याबाबत सविस्तर असे की, असाच गैरप्रकार मेहरुण मधील तांबापुरा भागात दिसून आला. या झोपडपट्टी भागात नागरिकांनी भर दिवसा विज खांबावर सर्रास आकोडे टाकलेले दिसून आले. तसेच शिरसोली रोडवरील झोपडपट्टीतील रहिवाश्यांनी देखील मुख्य रस्त्यावरील विज खांबावर आकोडे टाकलेले यावेळी दिसून आले. तर हा सर्व गैरप्रकार महावितरण विभागाला दिसत नसेल का? की या गैरप्रकाराकडे महावितरण विभाग अर्थपुर्ण दुर्लक्ष करतेय? असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय.
याबाबत सत्यमेव जयते न्यूज ने मागे देखील या गैरप्रकारा बाबत वृत्त प्रकाशित केले होते. तरी देखील महावितरण विभागाला जाग आली नाही. एकट्या तांबापुरा या झोपडपट्टी भागातून हजारो व्हॅट वीज चोरी केली जाते व या चोरलेल्या विजेची भर काढण्यासाठी महावितरण विभाग सामान्य ग्राहकाला अव्वाच्या सव्वा बिल देत असते. या वीजचोरांना लगाम घालण्यास ३३/११ के.व्ही. उपकेंद्र महाबळ, मेहरूण या महावितरण कार्यालयाला अपयश आल्याचे दिसून येते. वीज चोरी ही एक मोठी समस्या आहे. नियमित वीज बिल भरूनही अनेकांना भारनियमनचा नाहक त्रास सहन करावा लागतो. तर आता तरी महावितरण विभागाला जाग येऊन या गैरप्रकारावर कारवाई करेल का? याकडे लक्ष लागून आहे.
अनर्थ घडल्यास जबाबदार कोण?
वीज चोरीच्या गैरप्रकारामुळे महावितरण विभागाला अखंडित वीज सेवा देण्यास अडथळा निर्माण होतो तर मुख्य वीज खांबावर आकोडा टाकल्याने विजेचा भार कमी जास्त होऊन वारंवार शॉर्टसर्किट होणे, रोहित्र जळून आग लागणे तसेच या गैरप्रकारामुळे तांबापुरातील झोपडपट्टीत आग लागून मोठ्या प्रमाणात हानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
संगनमताशिवाय चोरी शक्य नाही
वीज चोरी करणारा व्यक्ती आणि वीज खांबावरील परिपूर्ण माहिती असलेल्या वीज कर्मचाऱ्याच्या संगनमताशिवाय हा प्रकार शक्य नाही. त्यातच शहरातील काही वस्त्यांमध्येही अनधिकृतपणे तारांवर आकोडा टाकणे सुरू आहे. हा प्रकार चुकीचा असून त्याचा भुर्दंड अप्रत्यक्षपणे प्रामाणिक ग्राहकांवर पडत आहे. वीज कंपन्यांनी तातडीने हा प्रकार करणाऱ्या वीज कर्मचाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे.