<
जळगाव-(प्रतिनिधी) – शासकीय महाविद्यालयातील कोवीड रूग्णालयातील शौचालयात गेल्या चार पाच दिवसांपासून कोरोना पॉझिटिव्ह ८२ वर्षीय वृध्द महिलेचा मृतदेह आढळून आल्याने कोविड रुग्णालयाच्या प्रशासनाच्या भोंगळ कारभाराचे पितळ उघडे पडले आहे. सदर महिला रुग्ण बेपत्ता असल्याची तक्रार नातेवाईकांनी सहा सात दिवसापूर्वीच पोलीसात दिली होती. त्यानंतर आज रूग्णालयाच्या वार्ड क्रमांक ७ मधील शौचालयात मृत स्वरूपात आढळून आल्याने खळबळ उडाली असुन प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे.
याबाबत सविस्तर असे की सदर वृद्ध महिलेला १ जून रोजी जिल्हा कोवीड रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते.तपासणी केल्यावर त्या वृद्ध महिलेचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता.त्यानंतर दुसऱ्या दिवशी नातेवाईकांनी विचारपूस करण्यासाठी संपर्क केल्यावर रुग्ण आढळून न आल्याने नातेवाईकांनी थेट पोलीसात हरविल्याची तक्रार दिली होती. आज मात्र त्या वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने प्रशासनाचा नाकर्तेपणा समोर आला आहे.
भोंगळ कारभाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करा – अभिषेक पाटील
कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या एका वृद्ध महिलेचा मृतदेह गेल्या चार पाच दिवसापासून शौचालयात पडून राहतो हा तर भोंगळ कारभाराचा कहर आहे या घटनेची तात्काळ गंभीर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्यात यावी या बाबत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे राष्ट्रवादीचे अभिषेक पाटील यांनी सांगितले आहे.
कोविड रूग्णालयात एका वयोवृद्ध महिलेचा मृतदेह शौचालयात चार -पाच दिवस पडून राहत असल्याची दुर्दैवी घटना समोर आल्याने याठिकाणी सेवेत असणाऱ्या डॉक्टर,नर्स,वार्डबॉय, स्वच्छता कर्मचारी यांच्या कामाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.