<
जळगाव – येथील वैद्यकीय महाविद्यालयाच्या कोविड रुग्णालयात बेपत्ता झालेल्या कोरोना बाधित महिलेचा मृतदेह शौचालयात आढळुन आल्याप्रकरणी एकट्या डीन डॉ.भास्कर खैरे यांना दोषी न ठरवता या प्रकरणी सामूहिक जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे. दोषींवर निलंबनाची कारवाई अटळ असल्याचे संकेत आरोग्य विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी दिले आहेतच.
गेल्या पाच सहा दिवसा पासून कोरोना पॉझिटिव्ह असलेली ८२ वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाली होती. त्या महिला रुग्णाचा कुजलेला मृतदेह रुग्णालयाच्या शौचालयात आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा भांडाफोड झाल्याचे दिसून येत आहे.
या प्रकरणात कुठलेही राजकारण न होता पारदर्शकतेने सामूहिक जबाबदारी निश्चित करून जबाबदार डीन, वैद्यकीय अधीक्षक, प्राध्यापक, नर्सिंग स्टॉफ, स्वछता कर्मचारी, जिल्हाधिकारी यांनी नियुक्त केलेले नोडल ऑफिसर यांना या प्रकरणी सामूहिक दोषी धरण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.