<
कळंब, प्रतिनिधी (हर्षवर्धन मडके) : कळंब तालुक्यात मोहा आरोग्य केंद्राची कोरोना संकटकाळात सतर्क सेवा सुरू असून रूग्णसेवेसह, कोरोनाविषयक सर्व्हेक्षण, जनजागृती व आरोग्य सेवा यांचे मार्गदर्शन दिले जाते. मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रात मोहासह ब्रह्मचीवाडी, शिंगोली, शे.धानोरा, खेर्डा, तांदळवाडी, बोर्डा, मस्सा, खामसवाडी, नागझरवाडी अशा दहा गावांचा समावेश आहे. कोरोना संसर्ग रोगाच्या संकटकाळात डॉ. राहुल नागरगोजे व डॉ. प्राची खताळ हे दोन वैद्यकीय अधिकारी सेवा देत असून फार्मासिस्ट एच डी थोरात तसेच 2 आरोग्य सहाय्यक, 2 आरोग्यसेविका, 1 स्टाफ नर्स, 2 परिचर, 1 लॅब टेक्निशियन, 1 गतप्रवर्तक, 1 वाहनचालक, 21 आशा कार्यकर्ती कार्यरत आहेत. मोहामध्ये 6 डिजिटल सखी, 8 अंगणवाडी कार्यकर्ती, ग्रामपंचायत मध्ये ग्रामविकास अधिकारी सी एन लोकरे, सरपंच राजू झोरी आणि 1 लिपिकसह 4 कर्मचारी, सहशिक्षक संजय मडके व पोलीस पाटील प्रकाश गोरे, तंटामुक्ती अध्यक्ष निरंजन दत्त पाटील, तंटामुक्ती उपाध्यक्ष अंकुश मडके, सलीम मोमीन, जावेद सय्यद आणि कोरोना वॉरियर्स टीम हे एकत्र काम करीत आहेत.
मोहा प्राथमिक आरोग्य केंद्राकडे एक रूग्णवाहिका असून औषधाचा साठा करण्यात आला आहे.
मोहा प्राथमिक आरोग्य केद्रांमार्फत आशा सेविकामार्फत गावातील घरोघरी जाऊन प्रत्येक घरातील व्यक्तीबद्दल नोंदी ठेवल्या जात आहेत. तसेच मुंबई, ठाणे, पुणे येथून परत येत असलेल्या व्यक्तींना प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात येते. परिसरात कोरोना संसर्ग रोगाचा प्रादुर्भाव होवू नये म्हणून मोहा प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी वर्ग विशेष परिश्रम घेत आहेत.
प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी प्रत्येक गावामध्ये जाऊन कोरोनाविषयक सर्व्हेक्षण करून कोरोना संसर्ग रोगाविषयी लोकांना माहिती देतात. शिवाय हात स्वच्छ ठेवणे, सॅनिटायझरने हात स्वच्छ करणे, तोंडावर रूमाल, मास्क बांधणे, घरातून बाहेर पडू नये, घरातच राहणे, सोशल डिस्टन्सिंग राखणे, वैयक्तीक स्वच्छता, परिसर स्वच्छता राखणे, इत्यादी आरोग्य सेवा जनजागृती करीत आहेत. तसेच गावात कोरोना सहाय्यता कक्ष उभारण्यात आला असून गावात ग्रामपंचायतीमार्फत सर्व गावात कोरोना रोगप्रतिबंधक औषध फवारणी केली आहे कोरोना पार्श्वभूमीवर जनजागृती मध्ये मोहा ग्रामपंचायत अग्रेसर आहे.
कोरोनाची भीती न बाळगता प्रतिकारशक्ती वाढविणाऱ्या आहारावर भर दिला पाहिजे. त्याचबरोबर नियमित व्यायाम, वारंवार हात स्वच्छ करणे, मास्क सोशल डीस्टसिगचे नियम आचरणात आणावेत. – डॉ. प्राची खताळ, वैद्यकीय अधिकारी प्रा.आ केंद्र मोहा.