<
मुलुंड : शेखर चंद्रकांत भोसले
मुलुंड पूर्व येथील विद्यालय मार्गावरील गुरुपुष्यामृत सोसायटीत राहणाऱ्या एका ७६ वर्षीय जेष्ठ नागरिकाचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत त्याच्या राहत्या घराच्या बाथरूममधून मुलुंड नवघर पोलिसांनी ताब्यात घेतला असून या इसमाचा मृत्यू कश्याने झाला याच्या तपासणीसाठी हा मृतदेह पालिकेच्या सावरकर हॉस्पिटलात पाठविण्यात आला आहे. तेथील डॉक्टरांच्या अहवालानंतर मरणोत्तर तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात मृतदेहाला पाठवायचे की कोरोनाच्या स्वब टेस्ट साठी पाठवायचे हे ठरविण्यात येणार आहे.
गुरुपुष्यामृत कॉलनीतील एफ इमारतीत पहिल्या मजल्यावर राहणारे शत्रुघ्न मुणगेकर, वय ७६ यांच्या घरातून कूजलेला वास येत असल्याने सोसायटीचे सचिव प्रसाद पावसकर यांच्याकडे आजूबाजूला राहणाऱ्या रहिवाशांनी तक्रार केली. त्याला अनुसरून सुरुवातीला सचिव प्रसाद पावसकर व इतर रहिवाशांनी पहिल्या मजल्यावर राहाणाऱ्या शत्रुघ्न मुणगेकर यांचा दरवाजा ठोकावला असता आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. काही रहिवाशांनी गेल्या ४ दिवसांपासून मुणगेकर घराबाहेर न पडल्याने दिसले नाहीत असे सांगितले त्यामुळे सोसायटीतील इतर रहिवाशांनी पोलिसांना व अग्निशमन दलाला फोन करुन पाचारण केले. पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी येवून जबरदस्तीने दरवाजा उघडला असता आतून कूजलेला वास येवू लागला. वासाचा अंदाज घेत शोध घेतला असता बाथरूम मधून वास येत असल्याचे समजले. बाथरूमचा दरवाजा आतून बंद असल्याने, हा दरवाजा तोडून अग्निशमन दलाच्या जवानांनी आत प्रवेश केला असता, आतमध्ये सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. गेल्या ३ ते ४ दिवसांपूर्वी या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेहाला पालिकेच्या सावरकर रुग्णालयात नेण्याचे ठरविले. त्यानुसार मुणगेकरांच्या दोन्ही मुलींची चर्चा करुन तात्काळ रुग्णवाहिकेला फोन करुन रुग्णवाहिका पोलिसांनी मागवून घेतली. रुग्णवाहिका येताच सदर मृतदेह रुग्णवाहिकेत टाकून पुढील वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आला.
दरम्यान, ‘शत्रुघ्न मुणगेकर हे एफ बिल्डिंगमध्ये एकटेच राहात होते तर त्याच्या दोन मुलींपैकी एक ठाण्याला तर एक मुलुंडला राहात आहे. कोरोना व लॉकडाऊनमुळे बहुतेक वेळा ते घराबाहेर न पडता मुलुंड पूर्वेतील शुभांगी कॅटरर्स मधून जेवणाचा डबा मागवित असत. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून ते सोसायटीच्या आवारात दिसले नाहीत आणि त्यात आज सकाळपासून कुजलेला वास त्यांच्या खिडकीतून येवू लागल्याने सोसायटीच्या रहिवाशांनी पोलिसांना व अग्निशमन दलाला बोलावून घेतले तसेच त्यांच्या मुलींना फोन करुन बोलावून घेण्यात आले. रुग्णालयाचा अहवाल आल्यानंतर पोलिस मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देतील, असा अंदाज आहे’, असे गुरुपुष्यामृत कॉलनीचे सचिव प्रसाद पावसकर यांनी अधिक माहिती देताना सांगितले.
मुलुंड नवघर पोलिस ठाण्याचे अधिकारी राजगुरू या प्रकरणात अधिक तपास करत असून रुग्णालयाचा काय अहवाल येतो यानंतरच त्यांच्या मृत्यूचे कारण समजू शकते, असे सूत्रांनी दिलेल्या माहितीवरून समजले.