<
जळगांव(प्रतिनिधी)- कोरोनाला रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीमुळे समाजातील अनेक घटकांची गैरसोय झाली आहे. या व्यक्तींना मदत करण्यासाठी विविध संस्थांनी पुढाकार घेतला आहे. अशातच कृती फाऊंडेशनने देखील गरजू लोककलावंतांना मदतीचा हात पुढे करून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे.
याबाबत सविस्तर असे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन असल्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती जपणाऱ्या लोक कलावंताचा संचारबंदी मुळे रोजगार बंद आहे. संचारबंदीमुळे त्यांना स्वतःच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे. या सगळ्याचा आढावा घेत कृती फाऊंडेशनच्या माध्यमातून या लोक कलावंतांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप करण्यात आले. जळगांव जिल्हा ऑर्केस्ट्रा असोशिएशनचे अध्यक्ष सलमान शाह व सचिव सोमनाथ शिंपी याची भेट घेऊन कलवंतांची गरज जाणून घेतली. सलग तीन महिन्यांपासून लॉकडाउन असल्याने या क्षेत्रातील सर्व कामे ठप्प झाली असून सर्व ऑर्केस्ट्राचे कार्यक्रम रद्द झाल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. याची कृती फाऊंडेशनने तात्काळ दखल घेत मदतीचा हात देऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत हे दाखवून दिले. यात शहरातील कीर्तनकार, शाहीर, गोंधळी, मुरळी, तमासगीर अशा विविध लोककलावंतांना फाऊंडेशनच्या वतीने जीवनावश्यक वस्तू देत आर्थिक मदत करण्यात आली. य़ा वेळी काही किराणा किट ऑर्केष्ट्रा असोशीएशनचे अध्यक्ष सलमान शाह यांचेकडे सुपूर्द करण्यात आले. कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर आले असून समाजातील गरजूंना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक लोककलावंतांची उपजिविका कलेवरच अवलंबून आहे. अशा वेळी अनेक कलाकारांना त्यांच्या अडचणी स्पष्टपणे सांगणे देखील अवघड जात होते. समाजातील अशा गरजू कलावंतांना फाऊंडेशनच्या वतीने मदत करण्यात येत असल्याचे फाऊंडेशन सचिव जी.टी.महाजन यांनी बोलताना सांगितले. सदर उपक्रमाची संकल्पना फाऊंडेशन सचिव जी.टी.महाजन व पोलीस बिनतारी संदेश विभागाचे अमित माळी यांची होती. प्रसंगी फाऊंडेशन अध्यक्ष प्रशांत महाजन, कार्यध्यक्षा तथा माधवबाग हॉस्पिटलचे डॉ.श्रद्धा माळी, डॉ.श्रेयस महाजन, सदगुरु भक्तराज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संदीप चौधरी, भारती चौधरी, सदगुरु सेवा मंडळाचे सचिव जगदीश तळेले पत्रकार चेतन निंबोळकर, फिरोज शेख आदी उपस्थित होते. यावेळी जळगांव जिल्हा ऑर्केस्ट्रा असोशिएशनच्या वतीने फाऊंडेशनचे आभार मानण्यात आले.