<
एरंडोल(प्रतिनिधि):-एरंडोल नगर परिषद प्रशासन सध्या खुपच चर्चेचा विषय ठरले आहे. येथील नगरपालिकेत कार्यरत तत्कालीन बांधकाम अभियंता पंकज कैलास पन्हाळे यांना माहीती अधिकारात माहीती न दिल्यामुळे दोन प्रकरणात एकूण सात हजारांची शास्ती (दंड) सुनावण्यात आला आहे.
राज्य माहीती आयोग खंडपीठ नाशिक यांच्यातर्फे ही सुनावणी करण्यात आली असून एरंडोल शहरातील दोन नागरीकांनी मागीतलेली माहीती न दिल्याने हा दंड ठोठावण्यात आल्याचे समजते.
याबाबत माहीती अशी की एरंडोल शहरातील रहीवासी रवींद्र नंदलाल लढे यांनी मुलकी चावडी(सध्याचे तलाठी कार्यालय) समोरील मुतारीची माहीती दि. ०६/११/२०१५ रोजी विचारली होती व ती न दिल्यामुळे चार हजार रूपये दंड सुनावण्यात आला. तसेच दुसर्या प्रकरणात शहरातीलच आबा संतोष महाजन यांनीही १४/०९/२०१६ रोजी नगर पालिका कर्मचार्याच्या कार्यालयीन पदासंबंधी माहीती विचारली असता ती न दिल्याने तीन हजार रूपये दंड तत्कालीन बांधकाम अभियंता पंकज कैलास पन्हाळे यांना राज्य माहीती आयोग खंडपीठ नाशिक यांनी सुनावला आहे.