<
कळंब, प्रतिनिधी / हर्षवर्धन मडके
जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. महाराष्ट्रात कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. कळंब तालुक्यातील मोहा मधील विद्यार्थी सुरक्षेसाठी परिसर निर्जंतुकीकरण करण्यात आले.
मागील तीन महिन्यांपासून कोरोना विषाणूच्या संक्रमणाला रोखण्यासाठी उपाययोजना म्हणून देशासह राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली. दरवर्षी १५ जून सुरु होणाऱ्या शाळा विद्यार्थी सुरक्षितता आणि कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी बंद आहेत. राज्य सरकार ग्रीन झोन असणाऱ्या भागांमध्ये काही नियम आणि अटी निर्धारित करून शाळा सुरु करण्याची प्रक्रिया करण्याच्या विचाराधीन आहे. याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत स्तरावर आणि शालेय स्तरावर शाळा सुरु होण्याच्या संदर्भातील कामास सुरवात झाली आहे. राज्य सरकारचा निर्णय जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी सुरक्षा आणि शाळांची दुरुस्तीच्या बाबतीत समस्या निर्माण होऊ नयेत यासाठी भविष्यकालीन तयारी सुरु करण्यात आली आहे. जिल्हा पातळीवरही प्रशासन या विषाणूचा संसर्ग होऊ नये म्हणून उपाय योजना करीत आहेत. याचा एक भाग म्हणून मोहा ग्रामपंचायतच्या वतीने मागील तीन महिन्यांपासून विविध उपाययोजना राबवल्या आहेत. राज्यात आता प्रायोगिक तत्त्वावर डिजिटल पद्धतीने शाळा सुरु करण्यात येणार आहे. तर कोरोनाचा प्रादुर्भाव नसलेल्या तसंच ग्रामीण आणि तुलनेने दूरच्या शाळांमध्ये पुरेशी काळजी घेऊन प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यात येणार आहे.
मोहा मध्ये ग्रामपंचायत वतीने कोरोना विषाणुचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा तसेच ज्ञानप्रसार विद्यालयात निर्जंतुकीकरण करण्यात आले. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर गेल्या तीन महिन्यांपासून पुणे मुंबई तसेच रेड झोन मधील परतलेल्या नागरिकांना ज्ञानप्रसार विद्यालयात क्वॉरंटाईन करण्यात आले होते परंतु राज्यसरकारने रुग्ण नसलेल्या भागात शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. जुलै पासून शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे याच पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत कडून दक्षता घेत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ज्ञानप्रसार विद्यालय तसेच जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत सॅनिटायझर तसेच जंतुनाशक औषधाची फवारणी करण्यात आली.
“शाळेत विद्यार्थ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. मुलांचे आरोग्य, स्वच्छता, सुरक्षा, आवश्यक सुविधा पुरवठा या बाबी महत्त्वपूर्ण आहेत. कोरोना संकटाच्या पश्चात शासकीय निर्णयानंतर शाळा सुरु करण्याची प्रक्रिया सुरु झालेली आहे. मुले येण्याआधी शाळा स्वच्छता आणि वर्गांमधील लहानसहान दुरुस्त्या करून सज्ज असायला हव्यात यासाठी शाळा परिसर स्वच्छ, निर्जंतुक करणे असे काम सुरु करण्यात आले असल्याचे मोहाचे सरपंच राजू झोरी यांनी सांगितले.”
शाळेत निर्जंतुकीकरण फवारणी करताना मोहाचे सरपंच राजू झोरी, ग्राम विकास अधिकारी सी एन लोकरे, ज्ञानप्रसार विद्यालयाचे मुख्याध्यापक टी जे चौधरी, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक जावळे सर, सलीम मोमीन, अतुल मडके, गणेश झोरी उपस्थित होते.