<
धरणगाव(प्रतिनिधी)- ज्ञानवंत आणि प्रज्ञावंत हे त्या गावची आयडियल असतात, ते गावचे भुषण असतात म्हणून त्यांचा सन्मान करणं हाच मोठा बहुमान आहे, असे प्रतिपादन धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरिक्षक अमोल गुंजाळ यांनी कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या पीएचडी प्राप्त प्रज्ञावंतांच्या सत्कार समारंभात केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे हे होते तर मंचावर संस्थेचे अध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी आणि पत्रकार बी.आर. महाजन हे उपस्थित होते. धरणगाव येथील डॉ. साई शरद कासार यांनी बायोकेमिस्ट्री मध्ये नुकतीच पीएच.डी.मिळवली.ते या विषयातले सुवर्ण पदक विजेते असून विज्ञान व तंत्रज्ञान विभागातील नामांकित इन्स्पायर फेलो पुरस्कारार्थी आहेत. त्यांचा सत्कार अमोल गुंजाळ यांच्या हस्ते करण्यात आला. प्रा. डॉ. रजनीकांत भगवान वाघ यांनी ‘अ न्यू वेब पर्सोनिलायझेशन टेक्निक टू इंप्रुव्ह ब्राउनिंग एक्सपिरियन्स’ या विषयावर नुकतीच पीएचडी मिळवली, त्यांचा सत्कार डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला तर डाॅ. दिनेश बोरसे यांनी’ नॅनो स्ट्रक्चर कॅडीमियान बेस्ड सोलर सेल्स या विषयावर नुकतीच पीएच.डी.मिळवली त्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. धरणगाव येथील शतकोत्तरी पी. आर. हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी संजय अमृतकर यांची नियुक्ती करण्यात आल्याबद्दल त्यांचाही विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, अतिथी परिचय व सूत्रसंचालन आर.डी.महाजन यांनी केले.यावेळी पत्रकार शरदकुमार बन्सी, अॅडव्होकेट शरद माळी, शारदा कासार, स्वप्नील कासार, शुभांगी वाघ, दीपक चौधरी, सुनील चौधरी, नितीन चौधरी, अशोक देशमुख, सागर पाटील, प्रकाश पाटील आदि उपस्थित होते. हा कार्यक्रम सोशल डिस्टनचे पालन करुन मोजक्या मान्यवरांच्या उपस्थितीत झाला. आभार प्रदर्शन कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनीलभाऊ चौधरी यांनी केले.