<
धरणगाव(प्रतिनिधी)- विद्यार्थ्यांनी यशाकडे जरूर धाव घेतली पाहिजे पण आयुष्य सार्थकी लागण्यासाठी सोबत सामाजिक बांधिलकीचे भानही जपले पाहिजे, असा सल्ला कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य साहित्यिक डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी कर्तव्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने आयोजित बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सुनील चौधरी हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून महात्मा फुले क्रांती युवा मंचचे अध्यक्ष प्रा.आर.डी. महाजन, प्रा. कविता महाजन, नाजनिन मॅडम आणि सुरेखा चौधरी हे मंचावर उपस्थित होते. डॉ. संजीवकुमार सोनवणे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात यश संपादन केल्यानंतर विद्यार्थी जसे आपले पालक, आपली शाळा, आपले गुरूजन यांविषयी जशी कृतज्ञता व्यक्त करतात तशीच कृतज्ञता समाजाविषयी आणि समाजातील उपेक्षित घटकांविषयी व्यक्त करुन समाजाचे उत्तरदायित्व स्वीकारावे, असे आवाहन केले. सुरूवातीला कार्यक्रमाचे प्रास्ताविक बी.आर. महाजन यांनी करून संस्थेची वाटचाल बद्दल माहिती दिली. याप्रसंगी ८९.३८ टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत धरणगाव तालुक्यात प्रथम आलेल्या इंदिरा गांधी कनिष्ठ महाविद्यालयाचा विद्यार्थी महेश संजय चौधरी याचा सत्कार ग्रंथ भेट देऊन डॉ. संजीवकुमार सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आला. धरणगाव पी. आर. महाविद्यालयातून विज्ञान शाखेत ८५.५३टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या चेतना शिवाजी चौधरी हिचा सत्कार प्रा. कविता महाजन आणि सुरेखा चौधरी यांच्या हस्ते करण्यात आला. वाणिज्य शाखेत ८०.७६ टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या भाग्यश्री दीपक भावसार हिचा सत्कार प्रा. आर.डी.महाजन आणि पत्रकार बी. आर. महाजन यांच्या हस्ते करण्यात आला. तर कला शाखेत ७४.१५ टक्के गुण मिळवून प्रथम आलेल्या विक्रम शेनपडू भोई याचा सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष सुनील चौधरी यांच्या हस्ते तर उर्दू माध्यमातून ८०.७६ टक्के गुण प्रथम आलेल्या सना कौशल मोहम्मद अकील या विद्यार्थिनीचा सत्कार नाजनिन मॅडम यांच्या हस्ते करण्यात आला. या सर्व गुणवंतांना ग्रंथभेट देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार पत्रकार बी. आर. महाजन यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते. कोरोनामुळे सोशल डिस्टंन्शनचे पालन करुन मोजक्या लोकांच्या उपस्थित हा सत्कार समारंभ पार पडला.